Ads

“हसत-खेळत गेले... पण परत आले नाहीत!”इंदिरा नगरच्या ५ जिगरी मित्रांचा वर्धा नदीत दुर्दैवी अंत

घुग्घुस (प्रतिनिधी):
सोमवारचा दिवस घुग्घुस शहरासाठी काळाकुट्ट ठरला. इंदिरा नगर येथील पाच जिगरी मित्र आनंदात घराबाहेर पडले, मात्र कोणालाही कल्पना नव्हती की ही त्यांची शेवटची भेट ठरेल. वर्धा नदीच्या बेलोरा घाटावर अंघोळीसाठी गेलेल्या या पाच युवकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला, आणि क्षणार्धात पाच कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या हृदयद्रावक घटनेत तन्मय पाथडे (१७), सनी असमपेली (१८), समय सोनटक्के (१७), रोहित बोबडे (१९) आणि नकुल केलजलकर (१८) या युवकांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी हे सर्व मित्र घरातून बाहेर पडले होते, मात्र त्यांनी नदीवर जात असल्याची माहिती कुटुंबियांना दिली नव्हती.
संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन बंद आढळले. नातेवाईकांनी शोध सुरू केला असता काहींनी त्यांना वर्धा नदीकडे जाताना पाहिल्याचे सांगितले. यानंतर बेलोरा घाटावर पोहोचलेल्या कुटुंबियांना किनाऱ्यावर पडलेले कपडे, मोबाईल व चप्पल पाहून धक्का बसला. अनर्थाची चाहूल लागताच परिसरात एकच हळहळ पसरली.
घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चंद्रपूर येथून बोट व शोध पथकाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, मात्र अंधारामुळे ती थांबवावी लागली.
मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळी सुमारे सात वाजता इंटेक वेलजवळ तन्मय पाथडे याचा मृतदेह आढळला. त्यानंतर दोन तासांत नकुल केलजलकर व सनी असमपेली यांचे मृतदेह सापडले. पुढे रोहित बोबडे व शेवटी दुपारी सुमारास समय सोनटक्के याचा मृतदेहही सापडला. पाचही मृतदेह इंटेक वेल परिसरात आढळले.
एकाच वेळी पाच युवकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण घुग्घुस शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment