राजुरा : शहरातील न्यायालयासमोरील गजबजलेल्या परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराने राजुरा शहर हादरले. न्यायालयाच्या समोर असलेल्या प्रदीप बिअर बारलगत नारळपाण्याच्या दुकानात बसलेल्या विनोद ऊर्फ पापा जाधव (वय ३५, रा. सोमनाथपूर) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
The thrill of shooting in front of Rajura Court!प्राथमिक माहितीनुसार, पापा जाधव हे नेहमीप्रमाणे मित्रांसोबत नारळपाण्याच्या दुकानाजवळ बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात व छातीत बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारात ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जाधव यांना उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेच्या वृत्ताला स्थानिक वृत्तमाध्यमांनीही दुजोरा दिला आहे.
आरोपींची ओळख समोर; पोलिसांसमोर शरणागती
दरम्यान, या प्रकरणात इंदिरानगर, राजुरा येथील करण मेकलवार (वय २२) आणि दीपक बाविसकर (वय २४) यांची संशयित आरोपी म्हणून नावे समोर आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोघांनी घटनेनंतर पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचे सांगण्यात येत असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गोळीबारात वापरलेले शस्त्र जप्त केल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.
भरवस्तीत गोळीबार; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
न्यायालयासमोरील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण काय, मृतक आणि आरोपींमध्ये पूर्ववैमनस्य होते का, तसेच हल्ल्याचे नियोजन नेमके कसे करण्यात आले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि जप्त केलेले शस्त्र याच्या आधारे तपास पुढे केला जात आहे.
0 comments:
Post a Comment