चंद्रपूर, दि. २४ नोव्हेंबर २०२६:
चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यामागील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईचे धागेदोरे नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचल्यानंतर चंद्रपूर पथकाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका शेतातील टीनाच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट विदेशी मद्य निर्मिती व बॉटलिंग कारखान्यावर छापा टाकला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोवा बनावटीच्या मद्य तस्करीचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत!
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली कारवाई:
दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांच्या पथकाने नंदोरी टोल नाका रोड, बोर्डा चौक परिसर, ता. वरोरा येथे एका बोलेरो पिकअप व टाटा हॅरियर वाहनातून अवैध विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने कारवाई केली. यामध्ये गोवा बनावटीच्या Royal Stag ब्रँडच्या १८० मिलीच्या ७१ बॉक्समधील ३,४०८ बाटल्या तसेच २ लिटरच्या १७ बॉक्समधील १०२ बाटल्या, असा एकूण ८८ बॉक्स मद्यसाठा जप्त करण्यात आला. मद्यसाठ्याची किंमत अंदाजे ११ लाख ३८ हजार रुपये असून दोन्ही वाहनांची किंमत अंदाजे २७ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ३८ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टाटा हॅरियर वाहनचालक बादल महादेव विरुटकर (वय २६ वर्षे) यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.
आरोपीच्या चौकशीतून नाशिकमधील बनावट मद्य कारखाना उघड :
अटक आरोपीकडे केलेल्या चौकशीत सदर मद्यसाठा नाशिक जिल्ह्यातून आणल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चंद्रपूर पथकाने दि. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका शेतातील टीनाच्या शेडमध्ये छापा टाकला. या ठिकाणी बनावट विदेशी मद्य तयार करून त्याचे बॉटलिंग व पॅकिंग करण्याचा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले.
या कारवाईत Royal Stag ब्रँडच्या १८० मिलीच्या १,९२० भरलेल्या बाटल्या, गोवा राज्य निर्मित Royal Impact ब्रँडच्या ७५० मिलीच्या १४४ भरलेल्या बाटल्या तसेच Royal Stag च्या १८० मिलीच्या १,६०० रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे ब्लेंड, १० लिटर क्षमतेच्या ड्रममधील बनावट मद्य, प्रिंटेड स्टिकर्स, रिकामे कागदी खोके, बाटल्यांची बुच, लेबल, पॅकिंग साहित्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत ७ लाख ५३ हजार ४७० रुपये आहे. या कारवाईदरम्यान बॉटलिंग कारखान्याच्या ठिकाणावरून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत नाशिक जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 'सी' विभाग व विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग यांनी सहकार्य केले.
विशेष म्हणजे, गोवा बनावटीचे मद्य वाहतूक करणाऱ्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या जिल्ह्यात सुरू असलेला बनावट विदेशी मद्य निर्मितीचा कारखाना शोधून काढण्यात चंद्रपूर पथकाला यश आले. या कारवाईमुळे बनावट विदेशी मद्य निर्मिती व त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा साखळीचा पर्दाफाश झाला आहे
कारवाईत सहभागी पथक :
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त, नागपूर विभाग गणेश पाटील व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत निरीक्षक वरोरा दत्तात्रय वरठी, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, प्रमोद राजोते, सागर धिडशे, हर्षराज इंगळे तसेच जवान किशोर डोंगरे, शुभम गोवारदिपे, मंगेश कुयटे, नितेश घाटे, किशोर पेदुजवार, जगदिश मस्के व वाहनचालक विलास महाकुलकर, प्रविकांत निमगडे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment