भद्रावती प्रतिनिधी / जावेद शेख :
मांगली नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक होत असल्याच्या प्रकरणाला अखेर महसूल विभागाने गांभीर्याने घेतले असून, गुरुवारी सकाळी धडक कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मांगली परिसरातील अवैध रेती व्यवसायावर महसूल विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता शिंदे पेट्रोल जवळ मंडळ अधिकारी मांगली योगेश गोहकर, ग्राम महसूल अधिकारी राहुल भोगडे व गोविंदा सेलोटे यांच्या पथकाने ट्रॅक्टर क्रमांक MH 34 CX 0998 वर कारवाई केली. मांगली नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून भद्रावतीकडे वाहतूक केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
वाहन चालक राजू शिरपूरकर याने दिलेल्या बयानानुसार सदर ट्रॅक्टर मांगली येथील श्री. सुरज सातपुते यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. महसूल पथकाने ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय भद्रावती येथे जमा केला आहे. संबंधित प्रकरणात दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्याकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली.
📰 ‘दि चंद्रपूर टाइम्स’च्या बातमीचा दणका?
मांगली नाल्यात मध्यरात्री रेतीचा कारभार सुरू असल्याबाबत ‘वॉईट कॉलरचा रुबाब, मांगली नाल्यात मध्यरात्री रेतीचा कारभार? विनापरवाना वाहतुकीला आळा घालण्याची मागणी!’ या शीर्षकाखाली दि चंद्रपूर टाइम्सने यापूर्वी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे वृत्ताची दखल घेत महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर एका राजकीय नेत्याचा असून दुसऱ्याच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगत आहे. मात्र, या चर्चेची अधिकृत पुष्टी झालेली नाही. महसूल विभागाच्या कारवाईतून अवैध रेती वाहतुकीचे जाळे किती खोलवर आहे, हे पुढील तपास आणि दंडात्मक कारवाईत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अवैध रेती उत्खननावर कारवाईचा बडगा उगारला; आता नाल्यांची लूट थांबणार का?
मांगली नाल्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभागाने नियमित गस्त व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0 comments:
Post a Comment