सावली (जि. चंद्रपूर) | प्रतिनिधी:
सावली तालुक्यातील मौजा रयतवारी येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा करून बनावट तंबाखूची निर्मिती व विक्री करणाऱ्या बेकायदेशीर केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त धडक कारवाई करत मोठा भांडाफोड केला. दिनांक ११ जून २०२६ रोजी झालेल्या या छाप्यात एकूण ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विजय भिमाजी भांडेकर (वय ३३, रा. सामदा बु., ता. सावली) हा आपल्या ताब्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखू साठवून मशीनच्या सहाय्याने बनावट (डुप्लिकेट) तंबाखू तयार करून बाजारात विक्री करत होता. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाच्या पथकासह रयतवारी येथील संशयित ठिकाणी छापा टाकला.
जप्त मुद्देमाल
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून खालील साहित्य जप्त केले—
HOLA व EAGLE ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू,
खुला सुगंधित तंबाखू
पॅकिंगसाठी लागणारे साहित्य
उत्पादन व पॅकिंग यंत्रसामग्री
वाहन (MH-34-CJ-9625)
एकूण जप्त मालाची किंमत ₹११,३१,४०० इतकी आहे.
चौकशीत आरोपीने हा कच्चा माल गडचिरोली येथील विनय गुप्ता याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. जप्त साहित्यावरून मोठ्या प्रमाणावर बनावट तंबाखूचे उत्पादन व बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मुल) सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या नेतृत्वात पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
0 comments:
Post a Comment