69 व्या प्रजासत्ताक दिनाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
* वीर मरण आलेले पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत
* अन्नधान्य वाटपासाठी ‘मिशन दिनदयाल’ ;दिव्यांगांसाठी ‘मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजना’
* रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांसाठी जिल्हास्तरावर सुरक्षा यंत्रणा कक्ष
* माहिलांच्या स्वावलंबनासाठी हिरकणी बचत गट योजना
* केशरी कार्डधारकांना देखील आता 2 व 3 रूपये दरात अन्नधान्य
* 500 कोटीचा चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपतींच्याहस्ते लवकरच लोकार्पण
* चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभारणार
चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 30 हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार आहेत. लवकरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करीत असताना गरीब शेतकरी, शेतमजूरांच्या जीवित्वाची जबाबदारी आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्याची घोषणा आज मी करत असून चंद्रपूर जिल्ह्यातील 70 हजार शेतकरी, शेतमजूर यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून आयुष्यभराचा विमा काढला जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली. प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला संबोधित करीत होते.
पावसाळी वातावरण असताना देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी व सामान्य नागरिक आजच्या प्रजासत्ताक कार्यक्रमाला उपस्थित होते. पोलीस ग्राऊंड मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर,आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी स्वातंत्र्य सैनिक सर्व क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आजच्या महत्त्वपूर्ण संबोधनाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवात केली. कधीकाळी आपण देखील विद्यार्थिदशेत या ठिकाणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे भाषण ऐकायला गर्दीत येत होतो. आपल्या राज्यघटनेमध्ये शक्ती आहे की एका सामान्य माणसाला देखील या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संबोधित करण्याची संधी दिली जाते. आपल्यापैकी एकाला भविष्यात ही संधी मिळणार आहे. अशा शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
जिल्हयामध्ये गेल्या काही दिवसात त्यांनी सुरू केलेल्या विशेष उपक्रमांचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. ही वाघांची आणि पराक्रमाची भूमी असल्यामुळे येथील युवकांनी वाघाप्रमाणे पराक्रम गाजवावा व भारतामध्ये या जिल्ह्याचे नाव अग्रकमाने घेतले जाईल असे कार्य करावे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. प्रत्येक क्षेत्रात विशेष कार्य करून देशसेवा घडू शकते असे त्यांनी यावेळी सांगितले ते म्हणाले...
चाहता हूँ कोई नेक काम हो जाए
मेरी हर साँस, देश के नाम हो जाए
यावेळी त्यांनी मिशन शौर्य गाजवणाऱ्या मुलांचे कौतुक केले. ज्यांनी कधी विमान बघितले नाही अशा आदिवासी विद्यार्थ्यांनी विमानाच्या उंचीवरील एव्हरेस्ट सर करून चंद्रपूरचे नाव देखील अजरामर केले. यावेळी त्यांनी युवकांनी मिशन सेवा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शासकीय नोकरीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुलांचा टक्का वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमांमध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाचनालय उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मिशन सेवा सोबतच आता मिशन शक्तीच्या माध्यमातून भारत मातेच्या चरणी ऑलम्पिक मेडल मिळवणाऱ्यात चंद्रपूर-गडचिरोलीचे विद्यार्थी असावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल उभारत असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर मध्ये ज्युबिली हायस्कुलच्या मागे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे क्रीडा संकुलाचे लवकरच उद्घाटन करत असल्याचे त्यांनी यावेळी घोषणा केली.
आज जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही घोषणा त्यांनी आपल्या भाषणात केल्यात. जिल्ह्यातील गरीब कुटुंब जे गरिबी रेषेच्या खाली नाहीत. परंतु गरीब आहेत अशांसाठी मिशन दीनदयाल अन्नधान्य स्वावलंबन योजना आजपासून जिल्ह्यात लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना एपीएल मध्ये अन्नधान्य मिळत नाहीत. अशा भगवे कार्डधारकांना देखील या पुढे दोन-तीन रुपये दराने धान्य मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली.
दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भातील राज्य शासनाची सकारात्मक भूमिकेला मांडताना त्यांनी जिल्ह्यासाठी मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजनेची आज घोषणा केली. 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या मात्र हाताने गाडी चालू शकणार या व्यक्तीला 45 हजार रुपये किमतीची बॅटरीवर चालणारी गाडी दिल्या जाईल, असे घोषित केले. याहीपुढे जाऊन दिव्यांग स्वतः रोजगार करू शकतात अशा 100 लोकांना सुरुवातीला 3.45 लक्ष रुपयांचे कर्ज उपलब्ध केले जाईल असे सांगितले.
जिल्हयामध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी यापुढे जिल्हा पोलीस प्रशासन घेईल असे सांगताना त्यांनी 'आम्ही घेतो काळजी महिला-मुलींची ' या घोषणे अंतर्गत जिल्ह्यामध्ये पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाईल. महिला हेल्पलाईन व वॉटस्ॲप नंबर देण्यात येईल. आवश्यकता असतांना पोलिसांचे संरक्षण, पोलिसांचे वाहन, रात्रपाळीतील महिलांना दिले जाईल असेही स्पष्ट केले.
बचत गट ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. यासाठी चंद्रपूर आणि लातुर जिल्ह्यामध्ये हिरकणी बचत योजना सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. नाविण्यपूर्ण काम करणा-या बचत गटांना तालुकास्तरावर प्रोत्साहित करण्यासाठी 1 कोटी 10 लक्ष रुपयांची तरतूद मंत्री मंडळाच्या निर्णयात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आपण कटिबद्ध आहे. गेल्या वर्षभरात शहीद छत्रपती चिडे व वीरमरण आलेल्या प्रकाश मेश्राम यांच्या दुर्घटनांचा उल्लेख करून त्यांनी पोलिसांच्या मदतीला समाजातील सज्जन शक्ती उभी राहावी, पोलीस मित्र तयार व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सशक्त युवा निर्मितीसाठी दीड कोटीचे व्यायाम शाळा उभारण्यात येईल, अशी घोषणा यावेळी केली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन, प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून त्यांनी जिल्हयातील 70 हजार गरीब शेतकरी, शेतमजूरांचा विमा काढणार असल्याचे सांगितले. 12 रुपये वर्षाला देखील अनेक शेतकरी भरु शकत नाही. मात्र संकटकाळात व दुर्देवी घटनात विमाच काढला नसल्याचे पुढे येते. त्यामुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून जिल्हा प्रशासन अशा शेतक-यांचा आयुष्यभराचा विमा काढेल, अशी घोषणा त्यांनी केली.
पळसगाव आमडी, चिचडोह आदी सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होत आहे. लोकार्पण नजीकच्या काळात होत असल्याचे सांगितले.आतापर्यंत 30 हजार हेक्टर सिंचन वाढ जिल्हयात झाली आहे. पुढील दिड वर्षात हे सिंचन दिड लक्ष हेक्टर वाढविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत गावांमध्ये बंधारे बांधले जातील. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी वाहून जाणार नाही. जमिनीत मुरेल व विविध योजनामार्फत सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूक्ष्म सिंचन वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी देखील या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे क्लस्टर तयार करावे व उत्पन्न दुप्पट करावे असेआवाहन केले.
हा जिल्हा रोजगार युक्त व्हावा यासाठी ताडोबा पर्यटन केंद्र, डायमंड प्रशिक्षण केंद्र, पोंभुर्णा येथे एमआयडीसी, अगरबत्ती क्लस्टर,पीक उत्पादन वाढीसाठी उन्नत शेती प्रकल्प, अशा अनेक मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
शिक्षणामध्ये हा जिल्हा अग्रेसर असावा, दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी टाटा ट्रस्टच्या मदतीने पालकमंत्री संगणक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेची व्याप्ती पूर्ण 15 तालुक्यांमध्ये वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बल्लारपूरला डिजिटल शाळा होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेला वॉल कम्पाऊंड, वर्ग खोली देण्यात येत आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी 'आयएसओ ' तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी वाचनालय उभारण्यात येणाऱ्या येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्याची ओळख येथील सांस्कृतिक चळवळीवर असते त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये संस्कृतिक चळवळ अधिक बळकट व्हावी यासाठी चंद्रपूर येथील प्रियदर्शीनी सभागृह अद्यावत करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी,वरोरा, बल्लारपूर, मूल येथील सांस्कृतिक भवन देखील तयार होत आहे.
यावेळी त्यांनी जिल्ह्यात उभ्या राहत असलेल्या पायाभूत सुविधांचा देखील उल्लेख केला बल्लारपूर जवळ सैनिकी शाळा उभी राहत असून या शाळेतून भविष्यात देशासाठी लढणारे नवजवान तयार होतील आमच्या चंद्रपूरच्या युवकांना ही संधी मिळणार आहे असे सांगताना ते म्हणाले,
कुछ नशा ये तिरंगे की आन का है
कुछ नशा मातृभूमी के मान का है
हम लहरा देंगे हर जगह पे तिरंगा
नशा ये हिंदुस्तान की शान का है
या कार्यक्रमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार व कौतुक केले. यावेळी त्यांनी गेल्या वीस तारखेला कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांना दिला. यावेळी जिल्हा मध्ये कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या छत्रपती चिडे यांचेही स्मरण यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक दिपक नारायण चालुलकर, पोलीस शिपाई प्रिती बोरकर व वैशाली पाटील यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल गजानन पुरुषोत्तम पांडे, अश्विनी रामदास करकाडे व स्वरुप विजय काटकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संचालन अशोक सिंह उपाख्य मोंटू सिंग व मंगला आसुटकर यांनी केले.
0 comments:
Post a Comment