हिंगोली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हिंगोली नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या अनावरण समारंभास पालकमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार रामराव वडकुते, आमदार विक्रम काळे, आमदार संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवरायांच्या भव्य स्मारकाचे अनावरण करण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, सर्वसामान्यांना अत्याचाराच्या जोखडातून दूर सारुन स्वराज्याची संकल्पना रुढ केली. अशा महापुरुषांचे स्मारक आपल्या सर्वांना सदोदीत प्रेरणा देत राहिल. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व महान होते. त्यांनी छोट्या छोट्या विखुरलेल्या लोकांना एकत्र आणून स्वराज्यासाठी लढा दिला. स्वराज्यातून सुराज्याकडे वाटचाल करीत परिवर्तन घडवले. समाजातील जातीभेद, भेदभाव दूर करुन सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला. त्या शिवरायांच्या राज्याची संकल्पना त्यांच्याच अशिर्वादाने राज्य सरकार काम करीत आहे. शेवटच्या माणसापर्यंत काम करीत वेगवेगळे निर्णय घेत हे सरकार वाटचाल करीत आहे. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी हिंगोली येथील शिवाजी महाराजांचा हा पुतळा अत्यंत तेजस्वी असल्याचे सांगत आयोजकांचे अभिनंदन केले.
प्रारंभी पुतळ्याचे रिमोटद्वारे अनावरण करुन मुख्यमंत्री व मान्यवरांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रास्ताविकात नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी माहिती दिली. हिंगोली नगर पालिकेने शासनाच्या मान्यतेने पुतळ्यासाठी विश्रामगृहा शेजारची 6200 चौ. फु. जागा 41 लाख 26 हजार रुपयांना खरेदी केली व त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारला. यासाठी व सुशोभिकरणाच्या कामांसाठी विविध योजनेतून 76 लाख 19 हजार रुपये खर्च करण्यात आला. या पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्यांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार , यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment