Ads

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?


▪माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अर्ज केलाच नाही

▪काँग्रेसकडून 12 जणानी केले अर्ज


चंद्रपूर/ प्रातिनिधी :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?, असा प्रश्न चर्चेत आहे. यातच माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अर्ज केलाच नाही. त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण बारा जणांनी अर्ज केले. यावेळी या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना परत उमेदवारीची शक्यता वर्तविली जात असताना काँग्रेसकडून मात्र इच्छुक दावेदारांची यादी वाढत आहे. पण कॉंग्रेसचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्यातील चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा व वरोरा या चार तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. हा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९९६मध्ये या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले. त्यानंतरच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. २००४ नंतर मात्र भाजपने आजतागायत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभेच्या दृष्टीने राजकीय हालचालींनी वेग पकडला असला तरी अद्यापही कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी स्पष्ट झालेली नाही.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात खरी लढत भाजप-काँग्रेसमध्येच होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला आता सुरुवात झालेली आहे. विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार हे लोकसभा लढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत, तर दुसरीकडे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मात्र आपला अर्ज भरलेला नाही. मागील वेळेस पुगलिया यांना डावलून संजय देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यानंतर देवतळे भाजपवासी झाले. ते बघता आता नविन चेहऱ्याला संधी मिळण्याची  शक्यता आहे. यात तेली समाजातील नेते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. माजी खासदार दिवंगत नेते शांताराम पोटदुखे यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली होती. त्यांच्या निमित्ताने तेली समाजाला संधी मिळाली. या लोकसभा मतदारसंघात तेली समाज सर्वाधिक असून, त्यातील अनेक दावेदार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यात प्रामुख्याने तेली समाजाचे वरिष्ठ नेते आणि सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, देवराव घटे यांचा समावेश आहे. समाजा पाठोपाठ कुणबी समाजाचीही संख्या मोठी असल्याने या समाजातूनही इच्छुकांची यादी पुढे आली आहे. यात मनोहर पाउनकर, दिनेश चोखारे, बाळू गोहोकार यांचा समावेश आहे. याशिवाय प्राध्यापक कोंगरे, आमदार कासावार, सुनीता लोढीया, शिवा राव यांनीही उमेदवारी साठी अर्ज दाखल केला आहे.


चंद्रपूरची जागा सेवादलला राखीव 
केंद्रीय स्तरावर पक्ष नेतृत्त्वात मोठ्या प्रमाणात  झालेले बदल आणि आगामी लोकसभा बहुमताने जिंकण्यासाठी कांग्रेस रणनीती आखत आहे. त्यानुसार काँग्रेसच्या विविध विंगमधील लोकांना पुढे आणण्यासाठी योजना आखली जात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मागील १५ वर्षांचा इतिहास बघता यंदा चंद्रपूरची जागा सेवादल साठी राखीव ठेवण्याचा विचार पक्ष निरीक्षक करीत आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील काही जेष्ठ नेत्यांना २६ जानेवारी ला प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईला बोलाविले होते. त्यानंतर वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या सर्वांना ५ फेब्रुवारीला दिल्लीला बोलावून घेतले. चंद्रपूरच्या या जागेवर चर्चा करण्यासाठी सेवादल चे राष्ट्रीय संघटक लालजी देसाई यांनी हि जागा सेवादलच्याच एखाद्या कार्यकुशल कार्यकर्त्याला देण्याची आग्रही भूमिका मांडली. यावेळी नागपूर, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर येथील वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.

शिवाणीचे ब्रह्मपुरीत दौरे वाढले 
चंद्रपूर लोकसभेची जागा मिळावी, यासाठी विजय वडेट्टीवार प्रयत्नशील असून, तसे झालेच तर वारसदार म्हणून ब्रह्मपुरी विधानसभेतून सुपुत्री शिवाणी वडेट्टीवार निवडणूक लढू शकते. त्यासाठीच ती गेल्या ८ दिवसापासून ब्रह्मपुरीत दौरे करीत आहे. सावलीतील मेहा बुज येथे महिला काँग्रेसचा मेळावा, आरोग्य मार्गदर्शन व हळदीकुंकु कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थिती होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या सावली तालुक्याचा दौरा करीत आहेत.

नाहीतर हे येणार बाहेरील चेहेरे 
चंद्रपूर काँग्रेस कमेटीतील २ गटातील वाद जर निवडणूक काळापर्यंत शमला नाहीतर बाहेरील चेहेरे उभे करण्याचा प्रस्ताव सुरु आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांना तिकीट देण्याचा विचार पक्षातील काही नेते करीत आहेत.

पारोमिता विधानसभा लढणार
श्रमिक एल्गारच्या प्रमुख तथा दारूबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील,अशी चर्चा मागील काही दिवसापासून होती. शिवाय त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करित असल्याची चर्चा पुढे आली आहे. 
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment