*चंद्रपूरची धम्मभूमी समतेचा जाज्वल्य दीप – आ. किशोर जोरगेवार*
चंद्रपूरमध्ये ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ उत्साहात संपन्न
चंद्रपूर :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवरून समतेचा, करुणेचा आणि प्रज्ञेचा संदेश संपूर्ण मानवजात पर्यंत पोहोचला, त्या भूमीवर आज उभा राहून अतिशय आनंद व अभिमान वाटतो. या पवित्र स्थळाचा विकास करण्याचा संकल्प आपण केला आहे. ५७ कोटी रुपयांतून येथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. चंद्रपूरची धम्मभूमी म्हणजे समतेचा जाज्वल्य दीप असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, दीक्षाभूमी, चंद्रपूर यांच्या वतीने ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ दीक्षाभूमी येथे उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीवरून दिलेला धम्माचा संदेश हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण मानवजातीसाठी आहे. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून समता, बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीवर आधारित समाजव्यवस्था उभी केली. त्या विचारांमुळे आज देशात लोकशाही बळकट झाली आहे. आजचा हा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणजे बाबासाहेबांचा मार्ग आत्मसन्मानाचा, तर्काचा आणि परिवर्तनाचा आहे हे स्मरण ठेवण्याचा दिवस आहे. त्यांनी दाखवून दिलं की, शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तीन मंत्रांमुळे कोणताही समाज अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करू शकतो. चंद्रपूर हे बाबासाहेबांच्या कार्याशी नाळ जोडलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. नागपूरनंतर चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तनाचा कार्यक्रम झाला, ही आपल्या जिल्ह्याची अभिमानाची बाब असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्य पुरी-भाजीची व्यवस्था
*भाजपा, चंद्रपूर महानगर तर्फे अनुयायांसाठी सेवा उपक्रम*
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगराच्या वतीने दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे आलेल्या बौद्ध अनुयायांसाठी पुरी-भाजीची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने करण्यात आली. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment