चंद्रपूर, दि. १८ जून : अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांनी भद्रावती येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. ही कारवाई भद्रावती बसस्थानकाजवळ असलेल्या "बाबू कोल्ड्रिंक्स, पान मसाला अँड कन्फेक्शनरी" या दुकानावर करण्यात आली.
या कारवाईत श्री. अतुल सुरेश कोल्हे (वय ४० वर्षे) यांच्या ताब्यातून विविध प्रकारचा खुला सुगंधित तंबाखू, पानमसाला व सुपारी असा सुमारे ३३ किलो प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत २० हजार ५०० रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.
राज्यात विक्री व साठवणुकीस बंदी असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी तसेच संबंधित वाहन मालकाविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा क्रमांक ०६४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) के. आर. जयपूरकर तसेच चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रवीण उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी उमेश एम. कापगते यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी पी. डी. कांबळे व के. जी. मुले यांनी पार पाडली.
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
0 comments:
Post a Comment