चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदावरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला अखेर निर्णायक कलाटणी मिळाली असून, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थक गटाने बाजी मारली आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी १६ नगरसेवकांच्या बहुमताचा दावा ग्राह्य धरत सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले यांची काँग्रेस गटनेते म्हणून अधिकृत नोंद केली आहे. या निर्णयामुळे आमदार विजय वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. “Power shift in Congress!” – Dhanorkar group’s plan successful, Adabale becomes group leader; Adoor suffers a big blow
बहुमताचा हक्क मान्य – आयुक्तांचा स्पष्ट निर्णय
महापालिकेतील काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादात दोन गट आमनेसामने होते. सुरुवातीला राजेश अडूर हे गटनेते होते; मात्र धानोरकर समर्थक १६ नगरसेवकांनी त्यांच्यावरील विश्वास काढून घेत अडबाले यांची निवड केली. या निवडीच्या वैधतेवरून दोन्ही गटांनी विभागीय आयुक्तांकडे दावे दाखल केले होते.
नागपूर येथे झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आयुक्तांनी बहुमताच्या गटाच्या बाजूने निर्णय दिला. बुधवारी हा आदेश अधिकृतरित्या प्राप्त झाला.
२७ पैकी १६ नगरसेवकांचा ठाम पाठिंबा
आयुक्तांच्या आदेशानुसार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी २७ काँग्रेस नगरसेवकांचा गट अधिकृतपणे नोंदणीकृत झाला होता. त्यावेळी अडूर यांची एकमताने निवड झाली होती. मात्र १६ जून रोजी १६ नगरसेवकांनी ठराव मंजूर करून अडूर यांना पदावरून हटवत अडबाले यांना गटनेते म्हणून निवडले.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार
निर्णय देताना आयुक्तांनी सुनील हरिभाऊ काळे विरुद्ध अविनाश गुलाबराव मरडीकर प्रकरण २०१५ या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालाचा आधार घेतला. या निकालात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षगटाला स्वतःचा नेता निवडण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वडेट्टीवार गटाचा आरोप फेटाळला
अडूर समर्थक गटाने १६ नगरसेवकांवर पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. मात्र आयुक्तांनी हा मुद्दा ग्राह्य न धरता बहुमताच्या गटाचा दावा मान्य केला.
धानोरकर गटाचे वर्चस्व वाढले, पण संघर्ष कायम
या निर्णयामुळे महापालिकेतील काँग्रेसमध्ये प्रतिभा धानोरकर यांचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजी अजूनही संपलेली नसून, येत्या काळात या संघर्षाचे राजकीय पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हा निर्णय केवळ गटनेतेपदाचा नाही, तर चंद्रपूरमधील काँग्रेसच्या नेतृत्वावर नियंत्रण कोणाचे राहणार याचा आहे. बहुमताचा आधार घेत धानोरकर गटाने स्पष्ट संदेश दिला आहे—“संख्या आमच्याकडे, सत्ता आमची!”
दुसरीकडे, वडेट्टीवार गटासाठी हा इशारा आहे की, संघटनात्मक पकड कमकुवत झाली तर नेतृत्व हातातून निसटते.
0 comments:
Post a Comment