चंद्रपूर : मालमत्ता नोंदणीसारख्या महत्त्वाच्या शासकीय प्रक्रियेतही लाचखोरीचे सावट असल्याचे धक्कादायक चित्र चंद्रपूरमध्ये समोर आले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशनसाठी ठराविक ‘रेट’ आकारला जात असल्याची बाब उघडकीस आली असून, याप्रकरणी दुय्यम निबंधकच ACB च्या सापळ्यात अडकले आहेत.
मुद्रांक व नोंदणी विभाग, चंद्रपूर येथील दुय्यम निबंधक श्री. मोहन चंद्रकांत शेटट्टीवार यांनी तक्रारदाराच्या पक्षकारांच्या मालमत्तेच्या नोंदणीसाठी प्रत्येकी २ हजार रुपये, अशा दोन नोंदणींसाठी एकूण ४ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही रक्कम थेट न घेता त्यांच्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारली जात असल्याने कार्यालयात लाचखोरीची साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. ACB ने तक्रारीची पडताळणी करून पंचासमक्ष सापळा रचला असता, आरोपीने मागितलेली ४ हजार रुपयांची लाच ऑपरेटरमार्फत स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तात्काळ कारवाई करत ACB पथकाने आरोपीला जाळ्यात पकडले.
या घटनेमुळे नोंदणी कार्यालयातील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारे ‘प्रत्येक रजिस्ट्रेशनला ठराविक रक्कम’ घेतली जात होती का, याचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
दरम्यान, ACB ने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी.
0 comments:
Post a Comment