जावेद शेख भद्रावती : भद्रावती तालुक्यातील कडोली रस्त्यालगत चंद्रपूर–नागपूर महामार्गावर सोमवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. मागून येणाऱ्या वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटो पलटी झाला. या अपघातात ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या ६२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक महिला आपल्या जावयाच्या ऑटोमधून चंद्रपूरहून येत होत्या. कडोलीजवळ मागून आलेल्या MH 34 AA 5739क्रमांकाच्या वाहनाने ऑटोला धडक दिल्याने ऑटो रस्त्यावर पलटी झाला. या दुर्घटनेत ऑटोमध्ये बसलेल्या सिंधू सदाशिव आगलावे (वय ६२, रा. पाटाळा) यांचा गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती कोंडा फाटा पोलिसांनी भद्रावती पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तसेच घटनेचा तपास करण्यासाठी चंद्रपूर येथून फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment