घुग्घूस | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक अडवून चालकाला मारहाण करीत ट्रक पेटवून देण्याच्या गंभीर घटनेचा घुग्घूस पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूर यांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात घटनेनंतर फरार असलेल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडविणाऱ्या घटनेचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.Gang that set truck on fire in Ghugus exposed!
डंपर रोडवर ट्रक अडविला अन् पेटवून दिला!
दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री नकोडा ते बहिरांबाबा मंदिरादरम्यान असलेल्या डंपर रोडवर काही अज्ञात इसमांनी KVR कंपनीचा ट्रक (क्रमांक MH 34 CQ 3385) अडविला. त्यानंतर ट्रक चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून त्याला मारहाण करण्यात आली आणि ट्रकला आग लावून मोठे नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी ट्रक चालकाच्या तोंडी रिपोर्टवरून घुघूस पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६(f), १२६(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपास अन् गुप्त माहितीने आरोपी जेरबंद!
गुन्हा घडल्यानंतर चारही आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी घुग्घूस पोलीस आणि एलसीबी चंद्रपूरच्या पथकाने गुप्त माहितीदारांच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे दि. ९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारही आरोपींना अटक करून पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला.
अटक करण्यात आलेले चार आरोपी
१. समशेर मेहबूब शेख
२. खुर्शीद इकराम खान
३. आफताब नफिस अहेमद
४. इरफान रफिक शेख
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये व पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत PSI रवींद्र वाघ, पोलीस हवालदार अनिल बैठा, राकेश तुराणकर, विशाल हूड, पोलीस अंमलदार महेश भोयर, प्रसन्ना डोरलीकर, पवन डाखरे, रवींद्र शेंडे आणि तोताराम ठाकरे यांनी सहभाग घेतला.
ट्रक पेटविण्याच्या या गंभीर प्रकरणात चार फरार आरोपींना अटक करण्यात घुग्घुस पोलिस आणि एलसीबी पथकाला यश आले असून, आरोपींचा पुढील कायदेशीर तपास घुग्घूस पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment