जावेद शेख प्रतिनिधी,भद्रावती : शहरालगतच्या लेंडारा तलाव व आमराई परिसरात तसेच केसूर्लीच्या दिशेने जाणाऱ्या पांजण रस्त्यालगतच्या शेतशिवारात वाघाचा सातत्याने वावर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. माकोडे, कोल्हटकर, कन्नमवार, चटपल्लीवार आणि रब्बानी शेख यांच्या शेतालगत वाघाचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात दररोज शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी व मजुरांना जावे लागते. मात्र, वाघाच्या वावरामुळे शेतात काम करताना प्रत्येक क्षणी जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती या परिसरात आहे, त्यांनाही शेतात जाण्यास भीती वाटू लागली आहे. शेतीची कामे करायची तरी कशी आणि आपल्या जीवाची सुरक्षितता राखायची तरी कशी, असा गंभीर प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर उभा ठाकला आहे.
वाघाचा वारंवार वावर होत असल्याच्या माहितीची संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. एखादी अनुचित घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही वनविभागाची आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करणे गरजेचे आहे.
लेंडारा तलाव, आमराई परिसर, रामटेके रॉकेल डेपो, बराई समाज सोसायटीच्या शेताजवळील भाग तसेच केसूर्लीच्या दिशेने जाणाऱ्या पांजण रस्त्यालगतच्या शेतशिवारात वनविभागाने तातडीने गस्त वाढवावी. वाघाच्या हालचालींची पाहणी करून त्याच्या वावराची ठिकाणे निश्चित करावीत. शेतकरी व शेतमजुरांना आवश्यक सूचना देऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाघाच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना संबंधित यंत्रणांनी आणखी विलंब करू नये. शेतकरी आणि मजुरांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग व स्थानिक प्रशासनाने समन्वयाने तातडीची पावले उचलावीत. वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन वाघाच्या वावराबाबत त्वरित कार्यवाही करावी आणि आवश्यकतेनुसार नियमानुसार सुरक्षित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
0 comments:
Post a Comment