नागभीड : नागभीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात धान, बारदाना आणि गोदामातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत बाजार समितीचे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ३ ते साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Massive fire breaks out at Nagbhid Agricultural Produce Market Committee; Initial estimate of damage is Rs 3 to 3.5 crores!
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत तब्बल ६ हजार २८० पोती धान जळून खाक झाली असून, त्याचे एकूण वजन ५ हजार ३४० क्विंटल आहे. जळालेल्या धानाची अंदाजे किंमत १ कोटी ८६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय नवीन व जुना मिळून २१६ गाठी बारदाना तसेच सुमारे १ लाख ७ हजार ज्यूट बारदाना गोण्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच नागभीड, सिंदेवाही आणि ब्रह्मपुरी येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात धान व बारदाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.
सभापती गणेश तर्वेकर यांचा शेतकऱ्यांना दिलासा
या भीषण दुर्घटनेनंतर बाजार समितीचे सभापती गणेश तर्वेकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळाचा पंचनामा आणि नुकसानीचे सविस्तर मूल्यांकन झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे.
या आगीमुळे बाजार समितीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकरी आणि व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे नेमके कारण काय, याचा तपास होणे आवश्यक आहे.
नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीतील या दुर्घटनेमुळे धान उत्पादक शेतकरी आणि बाजार समितीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आता प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment