चंद्रपूर (घुग्घुस) : लॉयड्स मेटल्स कंपनीच्या आवारातून तब्बल दोन टन स्टीलचे साहित्य चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा घुग्घुस पोलिसांनी यशस्वीरीत्या छडा लावला आहे. या कारवाईत एका ६७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, चोरीला गेलेले स्टीलचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे औद्योगिक परिसरातील चोरीच्या घटनांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
Lloyds theft mystery revealed from scrap shop! Two-wheeler with 2 tonnes of steel seized; 67-year-old accused in police net
दोन टन स्टीलवर चोरट्यांचा डल्ला!
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी मनोज शंकरराव महाजन (वय ३९, रा. बापटनगर, चंद्रपूर) हे लॉयड्स मेटल्स कंपनी, घुग्घुस येथे कोक ओव्हन साईडचे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या आवारात रस्त्याच्या कामासाठी उघड्यावर ठेवण्यात आलेले 'जॉइंट बॉल ऑफ स्पेस फ्रेम' हे स्टीलचे साहित्य दि. १० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. चोरी गेलेल्या या साहित्याचे वजन अंदाजे दोन टन असून, त्याची किंमत १ लाख २० हजार रुपये होती.
याप्रकरणी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी फिर्याद दाखल झाल्यानंतर घुग्घुस पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
६७ वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकाला अटक
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयित आरोपी प्रमोद केशवराव कवाडे (वय ६७, रा. विठ्ठल बाबा मंदिर नगर, घुग्घुस), व्यवसाय स्क्रॅप दुकान, याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीचे स्टील साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली TVS वेगो मोपेड जप्त करण्यात आली.
१.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला :
चोरीचे स्टीलचे जॉइंट बॉल ऑफ स्पेस फ्रेम – अंदाजे २,००० किलो, किंमत १,२०,००० रुपये.
TVS वेगो मोपेड – किंमत ६०,००० रुपये.
एकूण जप्त मुद्देमाल – १,८०,००० रुपये.
पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार संजय अत्कुलवार, अनिल बैठा, विशाल हूड, पोलीस अंमलदार महेश भोयर, रवींद्र शेंडे, पवन डाखरे आणि तोताराम ठाकरे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या प्रकरणाचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment