चंद्रपूर | ब्युरो
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती आणि नेहमीच गजबजलेल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात बुधवारी सकाळी मानवी शीर आढळल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची भीती कमी होत नाही तोच चौकासमोरील रेल्वे पुलाखाली इरोज लॉनजवळ एका जुन्या होर्डिंगच्या परिसरात शिरविरहित धड आढळून आल्याने या घटनेचे गूढ अधिकच वाढले. या थरारक घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत मृतदेहाची ओळख पटवित बंगाली कॅम्प येथील ७० वर्षीय प्रभास सरकार असल्याचे निष्पन्न केले.
Bloody horror in the heart of Chandrapur! Human head found at Indira Gandhi Chowk, torso under railway bridge!प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सकाळी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातील पुतळ्याजवळ रक्ताने माखलेले मानवी शीर नागरिकांच्या निदर्शनास आले. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी, रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
श्वानपथकाच्या शोधमोहिमेत पुलाखाली धड आढळले!
मानवी शीर नेमके कोणाचे आणि संबंधित व्यक्तीचे धड कुठे आहे, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा होता. त्यानंतर श्वानपथकाच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. या शोधादरम्यान इंदिरा गांधी चौकासमोरील रेल्वे पुलाखाली इरोज लॉनजवळ जुन्या होर्डिंगच्या परिसरात शिर नसलेले धड आढळून आले. प्राथमिक तपासात चौकात सापडलेले शीर आणि पुलाखाली मिळालेले धड एकाच व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले.
११ नोव्हेंबरपासून होते बेपत्ता!
पोलिसांनी शहरातील दाखल बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी सुरू केली. यामध्ये बंगाली कॅम्प येथील प्रभास सरकार हे ११ नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी १३ नोव्हेंबर रोजी रामनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. उपलब्ध माहिती आणि परिस्थितीच्या आधारे पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख प्रभास सरकार अशी निश्चित केली. ते एका पायाने दिव्यांग असल्याचीही माहिती समोर आली आहे.
हत्या की भटक्या कुत्र्यांमुळे मृतदेहाची विटंबना?
मृतदेहाचे शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रभास सरकार यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले का? की नैसर्गिक मृत्यूनंतर भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाची विटंबना केली? अशी चर्चा सुरू आहे. प्राथमिक शक्यतेनुसार भटक्या कुत्र्यांनी शीर ओढत घटनास्थळापर्यंत आणले असावे, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही.
रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या घटनेच्या सर्व बाजूंनी तपास करीत आहे. ११ नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर प्रभास सरकार यांच्यासोबत नेमके काय घडले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून घटनाक्रमाच्या कड्या जोडल्या जात आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि सविस्तर तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या धक्कादायक घटनेने चंद्रपूरकरांना हादरवून सोडले असून, प्रभास सरकार यांच्या मृत्यूमागील गूढ उकलण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
0 comments:
Post a Comment