नागभीड : बसस्टॉपवर प्रवाशांची प्रचंड गर्दी, दुपारच्या कडक उन्हात बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी आणि दुसरीकडे बसस्टॉपलगत झाडाच्या सावलीत उभे असलेले ऑटो, असे चित्र नागभीड येथील दिवाळी बसस्टॉप परिसरात पाहायला मिळत आहे. प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असताना ऑटोचालकांना मात्र सावलीत जागा मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.“My name is Kadam. Write whatever you want; I am not afraid of anyone!” Nagbhid Traffic Police Officer Uses Arrogant Language Against a Journalist!
या गंभीर समस्येबाबत एका दैनिकाचे प्रतिनिधी सुभाष माहोरे यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी कदम यांच्याशी चर्चा केली. मात्र, प्रवाशांची समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याऐवजी कदम यांनी अत्यंत उर्मट भाषेत उत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी त्यांनी, "तुमच्याने बनते ते करून घ्या, जा लिहायचे असेल तर लिहा. माझे नाव कदम आहे. जा, तुम्हाला जे बनते ते करून घ्या. मी कोणाच्या बापाला भीत नाही," अशा शब्दांत उत्तर दिले.
विशेष म्हणजे, बसस्टॉपपासून २०० मीटरच्या आत कोणतेही खासगी प्रवासी वाहन उभे करू नये, असा सूचना फलक लावण्यात आलेला आहे. असे असतानाही या परिसरात ऑटो उभे राहत असल्याचे चित्र आहे. याबाबत विचारणा केली असता, संबंधित ऑटोचालकांना तिथे वाहने लावण्यास सांगितल्याचे कदम यांनी सांगितल्याचा आरोप आहे.
एकीकडे प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर दुसरीकडे सावलीच्या जागेवर ऑटोचालकांचा ताबा दिसून येत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पत्रकारांनी एखाद्या सार्वजनिक समस्येबाबत विचारणा केली असता त्यांना अशा प्रकारची भाषा वापरणे कितपत योग्य आहे? कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनच जर अशा प्रकारची मगरुरीची भाषा वापरली जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे?
या संपूर्ण प्रकरणाची नागभीड वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि बसस्टॉप परिसरात प्रवाशांना सावलीत थांबण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच नियमबाह्य पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात, याकडे नागभीडकरांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment