राजुऱ्यातील ‘माणुसकीची भिंत’ दुर्लक्षामुळे बनतेय कचरा संकलन केंद्र!

राजुरा, दि.१४ नोव्हेंबर 
       गरजू आणि गरीब नागरिकांना मोफत कपडे उपलब्ध व्हावेत, या उदात्त हेतूने नगर परिषद राजुराच्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सध्या दुर्लक्षाचा बळी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील मुख्य राज्य महामार्गाला लागून असलेल्या या कपडे संकलन केंद्राची सध्या दुरवस्था झाली असून, या ठिकाणी कपडे जाळणे, कचरा टाकणे आणि अस्वच्छता पसरविण्याचे प्रकार घडत असल्याने या उपक्रमाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
गरजू नागरिकांना उपयोगी पडावेत म्हणून अनेक दानशूर नागरिक अधूनमधून या ठिकाणी जुने व वापरण्यायोग्य कपडे आणून ठेवतात. मात्र, या कपड्यांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने तसेच काही जणांकडून या ठिकाणी आग लावून कपडे जाळले जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. कपडे जाळल्यामुळे आगीचा धूर आणि काजळी साचून या ठिकाणी सुंदर व आकर्षक रंगरंगोटी केलेल्या भिंती काळवंडल्या आहेत. परिसरात कपड्यांचे ढीग आणि कचरा साचल्याने माणुसकीच्या या उपक्रमाचे रूपांतर हळूहळू कचरा संकलन केंद्रात होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, मुख्य राज्य महामार्गालगत असलेले हे ठिकाण नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे असून, गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त सामाजिक उपक्रम म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. मात्र, योग्य देखभाल, स्वच्छता आणि नियंत्रणाअभावी या उपक्रमाची प्रतिमा मलिन होत आहे.
नगर परिषद प्रशासनाने या उपक्रमाला पुन्हा नवसंजीवनी द्यावी अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने केली आहे.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने या ठिकाणाची स्वच्छता करून पुन्हा आकर्षक रंगरंगोटी करावी, कपड्यांच्या संकलनासाठी व वितरणासाठी योग्य व्यवस्था निर्माण करावी, तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी आग लावणारे, कचरा टाकणारे आणि सामाजिक उपक्रमाचे विद्रूपीकरण करणाऱ्यांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवून त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच पोलिसांनी रात्रीच्या गस्तीवेळी या ठिकाणाकडे विशेष लक्ष द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
गरजूंच्या मदतीसाठी सुरू झालेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम केवळ नावापुरता न राहता पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर आणि गरजूंना आधार देणारा ठरावा, यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि सामान्य नागरिकांकडून होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment