Ads

भद्रावती पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

भद्रावती जावेद शेख , दि. २५ ऑगस्ट २०२६ :
भद्रावती पोलीस ठाणे हद्दीतून गोवंशाची अवैध व अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चार बोलेरो पिकअप वाहनांना पाठलाग करून अडविले. या चारही वाहनांमधून प्रत्येकी तीन, असे एकूण १२ गोवंश ताब्यात घेण्यात आले असून, चार वाहनांसह एकूण ₹२४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Cattle smuggling plot foiled; 4 Bolero pickups, 12 cattle seized

दि. २५ ऑगस्ट रोजी भद्रावती पोलीस ठाण्यात DYSP सचिन खेत्रे हे प्रभारी अधिकारी म्हणून उपस्थित असताना गुप्त बातमीदारामार्फत गोवंशाची संशयास्पद वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत DYSP सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मांगली गावाच्या दिशेने नाकाबंदी केली.

दरम्यान, संशयित बोलेरो पिकअप वाहने पोलिसांच्या निदर्शनास येताच चालकांनी वाहने पुढे नेऊन पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून चारही वाहने अडवून ताब्यात घेतली.

प्रत्येक वाहनात ३ गोवंश
पंचांसमक्ष वाहनांची तपासणी केली असता प्रत्येक वाहनात तीन गोवंश आढळून आले. जनावरांच्या वाहतुकीदरम्यान आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. तसेच गोवंशाच्या मालकी व वाहतुकीबाबत आवश्यक वैध कागदपत्रे उपलब्ध नसल्याचेही पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले.

चार चालक ताब्यात
या प्रकरणी शुभम भाऊराव वनवे (३०), साहिल ईश्वर बनसोडे (२२), राकेश आनंदाराव उताने (३६) तिघेही रा. लखेवेर, ता. जि. भंडारा, तसेच अजित दादाजी बारतीने (२१), रा. आष्टी काकडे, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

₹२४.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
कारवाईत चार बोलेरो पिकअप वाहनांची अंदाजे किंमत ₹२२ लाख, तर १२ गोवंशांची अंदाजे किंमत ₹२ लाख १९ हजार, असा एकूण ₹२४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त गोवंशांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत असून, त्यांच्या आरोग्यस्थितीबाबत आवश्यक प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कायदेशीर कारवाई सुरू
सदर प्रकरणी प्राण्यांना क्रूरतेपासून प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(d), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. गोवंशांची वाहतूक, मालकी, वाहतुकीचा उद्देश तसेच वाहनमालक किंवा अन्य व्यक्तींचा सहभाग याबाबत पुढील तपास सुरू आहे.

भद्रावती पोलिसांचा कठोर इशारा

गोवंशाची अवैध वाहतूक अथवा जनावरांना अमानुषपणे वाहनांमध्ये कोंबून वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तपासात वाहनमालक, गोवंशाचे मालक, खरेदी-विक्री करणारे किंवा मध्यस्थांचा सहभाग आढळल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई DYSP सचिन खेत्रे व सपोनि वीरेंद्र केदारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि संतोष केदारे, पोहवा गोपाल, पोहवा देव आनंद, पोहवा शेंदरे, पो.अं. प्रेम, पो.अं. योगेश, मपो.अं. दिपमाला तसेच सहाय्यक चालक पोहवा व होमगार्ड चालक यांनी सहभाग घेतला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment