शिवजयंती सोहळा नियोजनाची आढावा बैठक
मुख्यमंत्री, राज्यपालांसोबत अनेक मंत्र्यांची उपस्थिती.
शिवभक्तांच्या स्वागताची जुन्नरकरांची जंगी तयारी
जुन्नर, दि. १ (वार्ताहर) - संपूर्ण भारताचा मानबिंदू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जुन्नर येथे आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाची नियोजन बैठक पार पडली. याप्रसंगी प्रांत अजित देशमुख, उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना व सर्व शासकीय खात्यांचे अधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे मागील वर्षी साजरा केल्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून पाणी अडवा-पाणी जिरवा, बंधाऱ्यांची कामे आदी मोहीम मोठया प्रमाणात राबविण्यात येणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. याकरिता जुन्नर तालुक्यातील जनतेने सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
मंत्रीगणांच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळ्याचा मुख्य कार्यक्रम गडावर सुरू असताना किल्ल्यावरील जागेअभावी सर्व शिवभक्तांना गडावर सोडले जात नसून त्यांच्याकरिता प्रथमच किल्ल्यावरील जन्मसोहळ्याचे थेट प्रक्षेपण गडाच्या पायथ्याशी दत्तमंदिराजवळ दोन मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात येणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. मुख्य कार्यक्रमासाठी प्रवेशिका आवश्यक असून सदर कार्यक्रम झाल्यावर सर्व नागरिकांना किल्ल्यावर सोडण्यात येणार असून स्थानिक नेत्यांनी व येणाऱ्या शिवभक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदारांनी केले.
येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या प्रसंगी येणाऱ्या गाड्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी दत्त मंदिर परिसरात चार ठिकाणी भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून गडाच्या पायथ्याशी खाजगी गाड्यांना प्रवेश नसल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सांगितले. किल्ल्यावर जाणाऱ्या सर्व मार्गांवर प्रकाशव्यवस्था करण्यात येणार असल्याचे महावितारणाचे उपकार्यकारी अभियंता जयंत गेटमे यांनी सांगितले.
येणाऱ्या शिवभक्तांसाठी चार आरोग्य पथके आणि १०८ च्या चार व परिसरातील ११ रुग्णवाहिका कार्यरत राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी दिली. तर पाण्याचे १५ टँकर व १५० फिरती शौचालयांची व्यवस्था याप्रसंगी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी सांगितले. पुरातत्व विभाग व वनविभागाच्या वतीने गडावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय व वृक्षारोपण आदींची व्यवस्था करण्याबाबत पुरातत्व विभागाचे संवर्धन सहाय्यक शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले. जुन्नर नागरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांची डागडुजी, विविध ठिकाणची रोषणाई, अग्निशामक बंब आदी कामे करणार असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले. याप्रसंगी किल्ले परिभ्रमण मार्गावर विजव्यस्था आणि वाढलेल्या झाडांबाबत सामाजिक कार्यकर्ते रविंद्र काजळे यांनी सूचना केली.
याप्रसंगी शिवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय दुराफे, मराठा महासंघाचे राजेंद्र कुंजीर, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान घोलप, युवासेनेचे गणेश कवडे, बारवचे सरपंच संतोष केदारी, नगरसेवक समीर भगत, फिरोज पठाण,
तहसीलदार हनुमंत कोळेकर, संतोष वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, वनपाल कृष्णा दिघे, कृषी विभागाचे बापू रोकडे, समीर हुंडारे, सिद्धेश ढोले, संदेश जुंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट- विविध विकास कामांचे उदघाटन-
किल्ल्यावरील जन्मसोहळा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री व मंत्रीगण ओझर याठिकाणी विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार.
अष्टविनायक जोड प्रकल्पातील सुमारे ३०० कोटींच्या रस्त्यांची व इतर विकासकामांचे भूमिपूजन झाल्यावर मुख्यमंत्र्यांची ओझर येथे सभा होणार.
२) दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीनिमित् सामाजिक ,शैक्षणिक ,पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना शिवनेरीभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
0 comments:
Post a Comment