मुंबई, ता.११: -निवडणूक काळात महामानवांचे फोटो साक्षीला ठेवून दिलेली आश्वासने न पाहता स्वतःचाच शपथ नामा खोटे ठरविणारे महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची थट्टा करीत आहे; 31 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची प्रताडणा करीत आहे. माझा जुना अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून कर्मचाऱ्यांची थट्टा करीत आहे,* असा घणाघाती आरोप ज्येष्ठ भाजपा नेते, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रपरिषदेत केला. भाजपा प्रदेश कार्यालयात ही पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती.
आमदार सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, एसटी हा सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. "बहुजन हिताय बहुजन सुखाय" हे ब्रीद असलेल्या आणि त्या माध्यमातून गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कोट्यावधी जनतेची अविरत सेवा करणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे ज्या संवेदनशील भावनेने सरकारने बघणे अपेक्षित आहे तसे होताना दिसत नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीच्या काळात ज्या मोठ्या घोषणा या कर्मचाऱ्यांच्या किंवा एसटी महामंडळाच्या हितार्थ केल्या होत्या त्याचा विसर सत्तेत आल्यानंतर या नेत्यांना पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात भारतीय जनता पार्टी व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी अनेक उपयुक्त योजना कार्यान्वित केल्या होत्या. त्याच कार्यकाळात 800 पेक्षा जास्त बसेसची खरेदी शंभरपेक्षा अधिक बसस्थानकांची नुतनीकर, महिलांसाठी तेजस्विनी बस इत्यादी अनेक महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती. असे असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत आहेत म्हणून सूडबुद्धीने चुकीचे व्हिडिओ व्हायरल करून संभ्रम पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न महा विकास आघाडी सरकार कडून केला जात आहे. परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष यांनी निदान त्यांच्याच मंडळाच्या वेबसाईटवर अध्यक्षीय मनोगताचे पुन्हा एकदा वाचन करून त्याच विचारांशी आपण प्रामाणिक आहोत का, याचा विचार करावा असेही प्रतिपादन केले. परिवहन मंत्री म्हणालेत, एसटी १२ हजार कोटी रुपयांनी संचित तोट्यात आहे, परंतु या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दीड वर्षात ६ हजार कोटींचे नुकसान झाले हे सांगायला ते विसरले असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कर्नाटक परिवहन कर्मचारी आणि बेस्ट च्या कर्मचाऱ्यांपेक्षा, सुरक्षा रक्षकांच्या वेतनापेक्षा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन कमी ही बाब गंभीर आहे. आंदोलन करणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा आहे असे पत्रपरिषदेत शेवटी ते म्हणाले.
0 comments:
Post a Comment