चंद्रपुर : चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा विकास करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने केली जात आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीच्या आधारे चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा विकास केल्या जाईल असे आश्वासन सभागृहात दिले आहे.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर आणि चंद्रपूर केवळ या दोन ठिकाणी दिक्षा दिली. नागपूर दिक्षाभुमी चा विकास झाला. मात्र चंद्रपूर येथील दिक्षाभुमी उपेक्षीत राहिली आहे. त्यामुळे या पवित्र दिक्षाभुमी चा विकास करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मुंबई येथे झालेल्या पहिल्याच अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील दिक्षाभुमीच्या सर्वसमावेशक विकासासाठी एकत्रित 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या वतीने या मागणीचा सातत्याने पाठपूरावा सुरु आहे.
चंद्रपूरातील दिक्षाभुमीचा विकास व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागणी केली होती. 16 ऑक्टोबर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. मात्र येथे सोयी सुविधांचा अभाव असल्याने येथे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होते. त्यामुळे नागपूर दिक्षाभुमीच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचाही विकास करण्यात यावा अशी मागणी त्यांनी सदर मंत्री यांना केली होती. सोबतच प्रत्येक अधिवेशनात त्यांनी दिक्षाभुमीच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले आहे. सदर विकास कामाचा आराखडा तयार करुन तो शासनाकडेही पाठविण्यात आला आहे. येथे भव्य संविधान भवन निर्माण करावे अशी मागणीही आमदार जोरगेवार यांची आहे.
दरम्यान नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात 293 अन्वेयवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी पून्हा एकदा हा विषय मांडत चंद्रपूर येथील दिक्षाभुमीच्या विकासासाठी मोठा निधी देण्याची मागणी करत सदर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. दरम्यान आज यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे दिक्षाभुमीच्या विकासाठी प्रयत्न सुरु आहे त्यांनी वारंवार हि मागणी केली आहे. या दिक्षाभुमीचा विकास केला जाईल. येथे सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी सभागृहात दिले आहे.
मुख्यमंत्री यांनी स्वत: आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची दखल घेतल्याने चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा विकास गतीने होणार अशी आशा निर्माण झाली आहे. या अगोदर आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे अभ्यासिकेसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. आता स्वत: मुख्यमंत्री यांनीच आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची दखल घेतल्याने आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
0 comments:
Post a Comment