चंद्रपूर : महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध संघटनांच्या वतीने चार दिवसीय बहुजन समता पर्व या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक न्यू इंग्लीश हायस्कूल मैदानाव होणार आहे. ११ एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, १४ एप्रिलरोजी इंडियन आयडलफेम सायली कांबळे हिच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष डॉ. दिलीप कांबळे, अध्यक्ष संजय घाटे, कार्याध्यक्ष प्रा. इसादास भडके, नंदू नागरकर, कोमल खोब्रागडे व अन्य सदस्यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
Four-day Bahujan Samata Parv from April 11 in Chandrapur
११ एप्रिलरोजी सकाळी ८ वाजता काढण्यात येणाऱ्या बहुजन समता रॅलीने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी ६ वाजता समता पर्वचे उद्घाटन राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार असून, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, सीटीपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, किशोर मानकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम , महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. चार दिवसीय कार्यक्रमात कन्हैयाकुमार, दिल्ली सरकारचे माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम, प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे प्रबोधन करणार आहे. १२ एप्रिल रोजी नागालॅण्ड येथील आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, सुषमा अंधारे, शेख सुभान अली, तामिळनाडू येथील ओबीसी, आंबेडकरी नेते जी. करुणानिधी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतील. १३ एप्रिल रोजी माजी मंत्री छगन भुजबळ, आयपीएस मिलिंद डुंबेरे यांची उपस्थिती राहणार असून, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, डॉ. लक्ष्मण यादव मार्गदर्शन करतील.
१४ एप्रिल रोजी आयएएस हर्षदीप कांबळे, आयएएस विजय वाघमारे वर्धा येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक सावंत यांची उपस्थिती राहणार असून, अमरावती येथील डॉ. कमलाकर पायरस, इंजि. प्रदीप ढोबळे मार्गदर्शन करणार आहेत. चारही दिवस संध्याकाळी चंद्रपूर आयडॉल हा कार्यक्रम होणार असून, १४ एप्रिल रोजी अंतिम फेरीत चंद्रपूर आयडॉलच्या विजेत्याची घोषणा होणार आहे.
बहुजन रत्न पुरस्काराचे वितरण
या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा बहुजन रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यात गजानन गावंडे गुरुजी, शोभाताई पोटदुखे, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, बबनराव फंड, खुशाल तेलंग गुरुजी, नरेन गेडाम, किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, प्रफुल्ल देवगडे, सुभाष शिंदे, डॉ. प्रतिभा वाघमारे, अशोक सावंत यांचा बहुजन रत्न सत्कारमूर्तींमध्ये समावेश आहे.
0 comments:
Post a Comment