भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :भद्रावतीशेत शिवारात चरीत असलेल्या एका गाईवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना तालुक्यातील मांगली येथील शेत शिवारात घडली. या घटनेत शेतकऱ्याचे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती भद्रावती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मांगली येथील शेतकरी पांडुरंग रामचंद्र खापणे हे नियमित आपली गुरे घेऊन मांगली येथील शेत शिवारात चराईसाठी जात असतात. या शिवाराला लागून जंगल आहे. घटनेच्या दिवशी पांडुरंग खापणे हे या शिवारात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चरित असताना अचानक वाघाने एका गाईवर हल्ला केला व तिला जागीच ठार केले. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा करताच वाघाने तिथून पळ काढला. गाईचा मृत्यू झाल्यामुळे पांडुरंग खापणे यांचे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आवश्यक ती कार्यवाही केली. या परिसरात नेहमी वाघाचा वावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या पाळीव जनावरांना धोका निर्माण झाला आहे. सदर गाईची त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पांडुरंग खापणे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment