चंद्रपूर – कोळसा व महाऔष्णिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. संपूर्ण परिसराला प्रचंड उकाड्याच्या काळातही सातत्याने वीज खंडिततेचा सामना करावा लागत असून, व्यापारी, रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
Stop unannounced load shedding in the middle of summer! Otherwise, the electricity distribution office will be closed, protest
गेल्या एक महिन्यापासून बाबुपेठमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता होणाऱ्या या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाचे हे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपण जनता सहन करणार नाही, असा इशारा आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दिला आहे.
11 kV विकास नगर फिडर हा अतिशय मोठा फिडर असून, तो उपकेंद्रातून लालपेठ, आंबेडकर नगर व बाबुपेठ असा फेर घेतो. परिणामी लाईनचा शेवटचा भाग असलेल्या बाबुपेठ व आंबेडकर नगर भागात व्होल्टेज ड्रॉप आणि ट्रिपिंग सारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. सध्या बाबुपेठमध्ये केवळ एकच अंडरग्राउंड केबल असून, ती खराब झाली की संपूर्ण भाग अंधारात जातो.
या पार्श्वभूमीवर, **बागला चौक पासून थेट बाबुपेठ व आंबेडकर नगरसाठी स्वतंत्र लाईन टाकावी**, अशी मागणी आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, अधीक्षक अभियंत्यांनी महिनाभरात कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाबूपेठ परिसरातील वीज समस्येचे निराकरण करण्यासाठी डीपीडीसी (जिल्हा नियोजन विकास समिती) मार्फत निधी मागवण्यात येत आहे, परंतु शासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी डीपीडीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना, जिथे खऱ्या अर्थाने गरज आहे अशा बाबूपेठसारख्या भागांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
**"जर महिनाभरात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर आम आदमी पार्टी जनतेला सोबत घेऊन वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल आणि टाळे ठोकेल,"** असा स्पष्ट आणि ठाम इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.
या वेळी निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर, महिला महानगर अध्यक्षा अॅड. तब्बसूम शेख, युवा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, कार्यकर्ते मनीष राऊत, हर्षल नेवलकर, निशाण गजभिये, वामन सरदार, भाऊरावजी दुर्योधन, प्रवीण वासनिक, मारोती करंबे, शंकरराव येरकल, फ्रँक्लीन रामटेके, केशव भडके, भीमराव खोब्रागडे तसेच बाबुपेठ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment