चंद्रपुर :-रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी दिलेला तीव्र विरोध अखेर यशस्वी ठरला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्रमक भूमिका घेत रामबाग मैदानाला जराही धक्का लावू नका असे जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर इमारतीसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाईल असे मान्य केले आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलिस विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव, आंदोलनकर्ते तथा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, माजी नगरसेवक राजेश अड्डूर, प्रदीप किरमे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, रजनी पॉल, राशिद हुसेन, अमोल शेंडे, करणसिंह बैस, मंजुश्री कासनगोट्टूवार यांच्यासह नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आमचा विकासकामांना कधीच विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या भावनांवर आघात होत असेल, तर आम्ही कधीही गप्प बसणार नाही. रामबाग मैदान ही केवळ मोकळी जागा नाही, ती नागरिकांच्या आरोग्याशी, जीवनशैलीशी आणि भविष्यातील पिढ्यांशी जोडलेली आहे. हे मैदान खेळाडू, मुले आणि वृद्ध नागरिक यांचा श्वास आहे. हा केवळ मैदानाचा नव्हे, तर नागरिकांच्या हक्कांचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा प्रश्न आहे. लोकशाहीत जनतेच्या भावना केंद्रस्थानी असल्या पाहिजेत. त्या पायदळी तुडवून कोणताही विकास होऊ शकत नाही असे ते यावेळी म्हणाले.
या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी शहरात इतर पर्यायी जागा आहेत. त्या तपासून नागरिकांच्या भावना न दुखावता विकास साधावा अश्या सूचना केल्यात. त्यांच्या या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत मैदानाला धक्का न लावता पर्यायी जागा शोधनाचा निर्णय घेतला आहे. दुसरी जागा निश्चित करतानाही नागरिकांची सहमती घ्यावी, अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली. तसेच, इमारतीसाठी खोदण्यात आलेले रामबाग मैदान तातडीने पूर्ववत दुरुस्त करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.
आजचा दिवस हा जागरूक नागरिकांचा विजय आहे. तुम्ही आवाज उठवला, आपण त्या आवाजाला बळ दिले. शेवटी लोकशाहीत जनतेचा आवाज महत्त्वाचा असतो आणि तो ऐकला गेला, याचे समाधान आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्टपणे सांगितले. बैठकीस संबंधित सर्व अधिकारी, आंदोलक, नागरी प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment