चंद्रपूर – भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि ड दर्जाची महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेची अवस्था सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लोकहिताच्या दृष्टीने या महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर एका कर्तव्यदक्ष भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी आग्रही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
MP Pratibha Dhanorkar demands appointment of IAS officer to free Chandrapur Municipal Corporation from corruption
चंद्रपूर महानगरपालिका ही सध्या शिस्त आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत खूपच मागे पडली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत, आणि अनेक विकासकामे कागदोपत्रीच दिसत आहेत. कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता, प्रशासकीय दिरंगाई आणि गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. "चंद्रपूर महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एका सक्षम IAS अधिकाऱ्याची नेमणूक करणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या प्रशासनात दिसून येणारी शिस्तीची कमतरता आणि भ्रष्टाचाराचा विळखा यामुळे शहराचा विकास खुंटला आहे," असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
आता या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे चंद्रपूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. एका IAS अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0 comments:
Post a Comment