शेगाव : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून तिची छेडछाड करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोध घेऊन अटक केली. पोलिसांच्या या जलद आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.Minor girl molested on the pretext of 'lift'; Shegaon police arrest the accused within 24 hours!
दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता टेमुर्डा येथे पीडित मुलगी शाळेत जात असताना एका दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसविले. काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने चालत्या दुचाकीवरून उडी घेतली. यात तिला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेप्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात अप. क्र. २६५/२०२६ अन्वये कलम ७४ बीएनएस तसेच पॉक्सो कायदा २०१२ मधील कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीबाबत सुरुवातीला कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसतानाही शेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. टेमुर्डा, वरोरा तसेच इतर ठिकाणी शोधमोहीम राबवून तांत्रिक बाबींचा तपास करण्यात आला. तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या २४ तासांत अज्ञात आरोपीची ओळख पटविली.
पोलिसांनी गणेश बाळुराम कुमावत (वय ३४), रा. बोर्डा, ता. वरोरा, मूळ रा. बासडी खुर्द, जि. जयपूर, राजस्थान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून गुन्ह्याबाबत माहिती घेण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. आयुष नोपानी (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले, पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, सफौ दिलीप सुर, पोलीस हवालदार अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार आणि पोलीस शिपाई प्रशांत गिरडकर यांनी सहभाग घेतला.
0 comments:
Post a Comment