माजरी जावेद शेख : दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीला अखेर माजरी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शिताफीने अटक केली. शिवचरन मल्लार उर्फ हनीसिंग सगल्या केवट (वय ३६, रा. वार्ड क्र. ५, शास्त्रीनगर, घुग्गुस, ता. जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.४० वाजता करण्यात आली.Two Years on the Run, Finally Caught! Fugitive Robbery Accused Trapped by Police
प्राप्त माहितीनुसार, ८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता माजरी कॉलरी परिसरातील OCM नागलोन कोळसा खदान येथे फिर्यादी मोरेश्वर विठ्ठल वनकर (वय ३४, रा. मनगाव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) हे वेकोली सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी शिवचरन मल्लार उर्फ हनीसिंग केवट याने आपल्या साथीदारांसह तेथे प्रवेश करून घातक तलवारीचा धाक दाखवत सुरक्षा रक्षकाला धमकी दिली आणि त्याच्याकडील ₹५ हजार रुपये बळजबरीने लुटले.
या प्रकरणी माजरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६४/२०२४, कलम ३१०(२) भारतीय न्याय संहिता तसेच कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र शिवचरन केवट हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देत तब्बल दोन वर्षे फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेतली. अखेर नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याचा एमसीआर मंजूर केला असून आरोपीची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत माजरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. सुबोध वंजारी, पोउपनि. हरिदास चोपणे, पोलीस अंमलदार अनिस शेख (ब.नं. १६४४), प्रमोद मिलमिले (ब.नं. ९३४) तसेच चापोहवा राजेश सोनेकर (ब.नं. १५९०) यांनी सहभाग घेतला.
फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे माजरी पोलिसांकडून सांगण्यात आले.
0 comments:
Post a Comment