भद्रावतीत गांजा विक्रीचा डाव उधळला! 🚨 कारमधून १.१७० किलो गांजा जप्त; तिघे ताब्यात, ₹५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
भद्रावती जावेद शेख: शहरातील पंचशील वॉर्ड परिसरात पांढऱ्या रंगाच्या **स्विफ्ट डिझायर कारमधून गांजाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करत गांजा विक्रीचा डाव उधळून लावला. या कारवाईत १ किलो १७० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल आणि कार असा एकूण सुमारे ₹५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. पंचशील वॉर्ड परिसरातील एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH-49-AE-1340 मधून गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
पोलिस पथकाने पंच व वजनमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई केली. संशयित वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये प्लास्टिक पिशवीत भरलेला गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर गांजाचे वजन १ किलो १७० ग्रॅम, किंमत ₹१५,००० असल्याचे निष्पन्न झाले.
मोबाईलसह कारही जप्त
कारवाईदरम्यान संशयितांकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. त्यांची अंदाजे किंमत अनुक्रमे ₹१० हजार, ₹१० हजार आणि ₹५५ हजार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार किंमत ₹४ लाख ५० हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशाप्रकारे एकूण ₹५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
तिघांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणात वाजिद वहाब शेख (वय २३), आरिफ कौसर सैय्यद (वय २१) आणि विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २०(ब)(२)(ब) व २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन एस. खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भद्रावती पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. कारवाईदरम्यान पंच, छायाचित्रकार व वजनमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
भद्रावती पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात गांजा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 comments:
Post a Comment