राजुरा, ता.प्र. -
राजुरा पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली असा सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष ऊर्फ रितीक जानकीराम चौधरी, वय २५, रा. सोनापूर देशपांडे, ता. गोंडपिपरी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजुरा येथील भास्कर चव्हाण यांची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. तांत्रिक तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मोटारसायकलीसह अजनी (नागपूर शहर), नागपूर शहरातील सोनेगाव तसेच घुग्घूस पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्या मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांची एकूण किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीविरुद्ध राजुरा पोलिस ठाण्यात कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस सपोनि लक्ष्मण लोकरे, फौजदार किशोर तुमराम, राजेंद्र जुमनाके, विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, अनुप डांगे, शरीफ शेख,दिपक लालसरे, मिलींद जांभूळे, रमेश बस्सी, राजीव दुबे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
0 comments:
Post a Comment