चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा, पक्षातील प्रभाव आणि आर्थिक ताकद पणाला लावली; मात्र निवडून आलेल्या काही उमेदवारांकडून सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भूमिका बदलण्याचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. दिलीप कांबळे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षातील तसेच समाजातील राजकीय प्रवृत्तींवर थेट आणि आक्रमक शब्दांत भाष्य केले.Dr. Dilip Kamble Launches a Scathing Attack on the Politics of ‘Sweets’!
डॉ. कांबळे म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवरील निष्ठा, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य ही आपल्या राजकीय जीवनाची आधारस्तंभ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून, ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरमध्ये काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पाच उमेदवारांना तिकीट मिळवून दिले, पाचही जागा जिंकून आणल्या’
महानगरपालिका निवडणुकीत विनोद लाभणे, महानंद वाळके, आकाश मानकर, करिष्मा जंगम आणि हनुमान चौके या पाच उमेदवारांना पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपण पक्षातील आपली संपूर्ण पत आणि प्रतिष्ठा पणाला लावली, असा दावा डॉ. कांबळे यांनी केला.
“उमेदवारी मिळवून देण्यापासून ते प्रचारापर्यंत आणि मतदारांकडे मत मागण्यापर्यंत मी स्वतः पुढाकार घेतला. निवडणुकीत स्वतःचा पैसा खर्च करून पाचही जागा निवडून आणल्या,” असे ते म्हणाले.
‘मिठाई आली की भूमिका बदलते का?’
महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या चर्चेवर बोलताना डॉ. कांबळे यांनी काही बौद्ध उमेदवारांच्या कथित भूमिकाबदलावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांनी आरोप केला की, “आज एका बाजूने मिठाई आली तर तिकडे, उद्या दुसऱ्या बाजूने मिठाई आली तर दुसरीकडे, पुन्हा पहिल्या बाजूने मिठाई आली तर परत पहिलीकडे,” अशा प्रकारचे राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रकारामुळे बौद्ध समाजाच्या राजकीय नेतृत्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र काही व्यक्तींच्या कृतीवरून संपूर्ण समाजाला दोषी ठरवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ज्याने निवडून आणले, त्याचेच राजकीय करिअर झाले; जनतेचे काय?’
डॉ. कांबळे यांनी जनतेलाही आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.
“ज्या व्यक्तीने तुम्हाला तिकीट मिळवून दिले, निवडणुकीत पैसा लावला, प्रचार केला आणि समाजाकडे तुमच्यासाठी मत मागितले, त्याचा विश्वासघात करून जर स्वतःचे राजकीय करिअर घडवले जात असेल, तर सामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडवणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बौद्ध समाजात वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळ मजबूत असली तरी राजकीय बेरजेचे आणि जिंकण्याचे राजकारण अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘जनतेने जाब विचारावा’
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारांचा विश्वास आणि ज्यांनी त्यांच्यासाठी संघर्ष केला त्यांचे योगदान विसरू नये. सत्तेसाठी भूमिका बदलण्यापेक्षा जनतेच्या हिताची स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
“ज्यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले, त्यांच्याशी आणि मतदारांशी प्रामाणिक राहणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराचा जनतेने जाब विचारावा,” असे आवाहन डॉ. दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
0 comments:
Post a Comment