राजुरा, दि.७ सप्टेंबर :
राजुरा तालुक्यातील सास्ती येथील एकेकाळी मोठी विद्यार्थीसंख्या आणि नावाजलेली असलेली सर्वोदय विद्यालय आज विद्यार्थी पटसंख्या अभावी बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे. मात्र बंद पडलेल्या या शाळेतील महान क्रांतिकारक, समाजसुधारक आणि राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमा अक्षरशः अडगळीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या या ज्ञानमंदिरात महापुरुषांच्या विचारांचा सन्मान नेमका कुठे गेला? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सास्ती परिसरातील ही शाळा वेकोलीच्या कोळसा खाणीमुळे प्रभावित झालेल्या परिसरातील शैक्षणिक संस्था म्हणून अनेक दशके विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत होती. या शाळेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात पुढे गेले. त्यामुळे या शाळेचा परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
मात्र कालांतराने विद्यार्थीसंख्या कमी होत गेल्याने शाळा बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आज शाळेच्या बंद अवस्थेतील परिसरात धूळ, कचरा, मोडकळीस आलेले साहित्य आणि इतर वस्तूंच्या गर्दीत महापुरुषांच्या प्रतिमा व फोटोफ्रेम पडलेल्या अवस्थेत दिसत आहेत. संबंधित छायाचित्रातून या ठिकाणची अत्यंत दयनीय अवस्था स्पष्टपणे दिसून येते. महापुरुषांचा सन्मान शिकवणाऱ्या शाळेतच अशी अवस्था का? शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर देशाचा इतिहास, स्वातंत्र्यलढा, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय महापुरुषांचे विचार यांचीही ओळख करून दिली जाते. महापुरुषांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला जातो. मग त्याच महापुरुषांच्या प्रतिमांची शाळा बंद झाल्यानंतर अशी अडगळीत अवस्था होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
“पुस्तकी ज्ञान देताना राष्ट्रीय महापुरुषांचा सन्मान करायला शिकवणाऱ्या शाळेने प्रत्यक्षात त्यांच्या प्रतिमांची अशी अवहेलना करायला शिकवले असेल काय?” असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शाळा बंद झाली म्हणून इतिहासही अडगळीत टाकायचा का?
विद्यार्थीसंख्या कमी झाली म्हणून एखादी शाळा बंद होऊ शकते; मात्र त्या शाळेने जपलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाची जपणूक करणे ही संबंधितांची जबाबदारी आहे. महापुरुषांच्या प्रतिमा या केवळ भिंतीवरील चित्रे नसून त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्या सुरक्षित व सन्मानपूर्वक ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे. सध्या या प्रतिमांची झालेली अवस्था पाहता संबंधित शिक्षण संस्था, प्रशासन अथवा शाळा व्यवस्थापनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
दुर्दशेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी केली आहे. सर्वोदय विद्यालय सास्तीच्या सद्यस्थितीची पाहणी करून शाळेतील शैक्षणिक साहित्य, महापुरुषांच्या प्रतिमा तसेच इतर ऐतिहासिक व महत्त्वाच्या वस्तूंची योग्य प्रकारे जपणूक करण्यात यावी. प्रतिमा अशा अवस्थेत कशा पोहोचल्या, त्या कोणी आणि केव्हा अडगळीत टाकल्या, याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच शाळा वेकोलीच्या कोळसा खाण प्रकल्पामुळे प्रभावित परिसरात असल्याने, या शाळेची सद्यस्थिती आणि शाळा बंद होण्यामागील प्रशासकीय, शैक्षणिक तसेच स्थानिक परिस्थितीचीही वस्तुनिष्ठपणे तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ज्ञानमंदिर बंद झाले तरी महापुरुषांचे विचार आणि त्यांचा इतिहास बंद होऊ नये. त्यांच्या प्रतिमांचा सन्मानपूर्वक सांभाळ होणे हीच त्या शाळेला आणि तिच्या गौरवशाली इतिहासाला खरी आदरांजली ठरेल.
0 comments:
Post a Comment