भद्रावती | प्रतिनिधी lजावेद शेख :
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच भद्रावती पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. सायवन फाट्याजवळ रॉयल्टीविना रेती वाहून नेणारा टाटा कंपनीचा हायवा पोलिसांनी पकडला. या कारवाईत ८ ब्रास रेती आणि हायवा असा एकूण २० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
Police conduct midnight 'surgical strike' in Bhadravati! Sand truck caught; Goods worth Rs 20.64 lakh seized!
गस्तीवर असताना संशयास्पद हायवा आढळला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजल्यापासून ११ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस कर्मचारी प्रेमकुमार बावणकर हे रात्रपाळी अधिकारी आणि रात्रगस्तीच्या कर्तव्यावर होते. ११ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, चालक पोलीस हवालदार जगदीश आणि पोलीस कर्मचारी प्रेमकुमार बावणकर हे शासकीय वाहनाने गस्त घालत होते.
उर्जाग्रामच्या दिशेने जात असताना सायवन फाट्याजवळ त्यांना रेतीने भरलेला हायवा (क्रमांक MH-34-CQ-6099) दिसला. हा हायवा अॅश डॅमच्या दिशेने जात असल्याने पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर वाहन थांबवले.
रॉयल्टी मागताच रेती वाहतुकीचा प्रकार उघड
हायवा चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अरुण तुकाराम मडावी (वय ५६, रा. बिरसा मुंडा चौक, बाबूपेठ, चंद्रपूर) असे सांगितले. वाहनातील रेतीची रॉयल्टी विचारली असता ती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
ही रेती विठ्ठलवाडा समोरील पैनगंगा नदी घाटातून हायवा मालक निखिलेश चन्ने (रा. सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर) यांच्या सांगण्यावरून आणली होती आणि सायवन येथील अॅश डॅमजवळील सिमेंट साहित्य तयार करणाऱ्या कंपनीत नेली जात होती, असे चालकाने सांगितल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे.
२०.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ ब्रास रॉयल्टीविना रेती, अंदाजे ६४ हजार रुपये किमतीची, तसेच २० लाख रुपये किमतीचा टाटा हायवा असा एकूण २० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्रीच्या वेळी पंच उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी ई-साक्ष पंचनामा केल्याचे अहवालात नमूद आहे.
चालकासह हायवा मालकाविरुद्ध कारवाई
या प्रकरणी चालक अरुण तुकाराम मडावी आणि हायवा मालक निखिलेश चन्ने यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४८(७) व ४८(८) अन्वये कारवाई करण्याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
रात्रीच्या गस्तीतील या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, नदीघाटातून होणाऱ्या रेती उपशावर आणि वाहतुकीवर प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
0 comments:
Post a Comment