विदर्भातील ५ हजार २२३,नागपूर जिल्ह्यात ३२५ शेतकऱ्यांचे अर्ज
नागपूर/प्रतिनिधी:मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ पंधरा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी सुमारे २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या २६ हजार शेतकऱ्यांपैकी २ हजार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सर्व्हे करण्यात आलेला असून २ हजार २९३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अर्ज भरतांना काही त्रुटी असलेल्या ४१९ अर्ज सध्या नामंजूर करण्यात आले असून या शेतकऱ्यांनी अर्जातील माहिती दुरूस्त करून आपले अर्ज पुन्हा महावितरणच्या पोर्टलवरून भरावेत.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका व व्हॉट्स ॲप अशा माध्यमांचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील सर्व कर्मचारी व अभियंते सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. २ फेब्रुवारी २०१९ पर्यन्त राज्यातील सुमारे २८ हजार शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील पंधरा दिवसात १६ हजार ९६० शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
योजनेत विदर्भातील ५ हजार २२३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील ४१७ शेतकऱ्यांना महावितरणकडून मागणी पत्र दिल्या गेले आहे. विदर्भात सर्वाधिक अर्ज वाशीम जिल्ह्यातून आले आहेत. येथे १,५६८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.यातील १७० शेतकऱ्यांना महावितरणकडून मागणी पत्र वितरित करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात ३२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून यातील ११९ जणांना मागणीपत्र दिल्या गेले आहे. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. येथून ६०२ अर्ज आले आहेत. भंडारा जिल्ह्यातून ५४० अर्ज आले असून ४३ जणांना मागणी पत्र महावितरणकडून देण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment