चंद्रपूर, :
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 23 मेला होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज दिनांक 17 मे 2019 रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात घेण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संपत खलाटे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचे सादरीकरण केले. सुरक्षा व्यवस्था, टपाली मतपत्रिकाची गणना, मतमोजणी व्यवस्था, व्हीव्हीपॅट मतमोजणी, मतमोजणी कक्ष संरचना, मतमोजणी कक्षात वावरतांना घ्यावयाची काळजी, निवडणूक निकाल प्रसिद्धी अशा विविध विषयांचे मार्गदर्शन केले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये 14टेबल राहणार आहे. प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. तसेच मतमोजणी सूक्ष्म निरीक्षणासाठी मतमोजणी प्रक्रियेची शुद्धता तपासण्याकरीता व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. तसेच प्रत्येक हॉल करिता अतिरिक्त सूक्ष्म निरक्षक देण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीतील किमान 2 कंट्रोल युनिटची रँडम तपासणी आयोगाचे निरीक्षक चाचणी पद्धतीने करू शकतात. तसेच निकाल अचूक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना 17 सी भाग 2 च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून समिक्षा करून घेतील जेणेकरून पुढे कोणत्याही पुनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. या सर्व बाबींची वेळोवेळी पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचे वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी एस.भुवनेश्वरी, इतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment