Ads

कोरोना विरूद्ध लढाईत तरुणांनी नियम पाळणे व सहकार्य करणे आवश्यक : जिल्हाधिकारी
कोरोना विरूद्ध लढाईत तरुणांनी नियम पाळणे व सहकार्य करणे आवश्यक : जिल्हाधिकारी✨ जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी
✨ आठवड्यातून एकदाच बाहेर पडण्याचे नियोजन करा
✨ कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दी कमी करा
✨ शेती संदर्भातील सर्व प्रतिष्ठाने खुली ठेवा
✨ इलेक्ट्रिशियन, प्लंबर व जीवनावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांना मुबा
✨ आवश्यक कामांसाठी रस्त्यावर ओळखपत्रासह पायी बाहेर पडा
✨ पोलिसांकडून टू व्हीलर चालकांवर होणार कारवाई
✨ अन्य राज्यातूनही जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहील
✨ अत्यावश्यक सेवा प्रतिष्ठानातील सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणार
✨ शेतकऱ्यांच्या वाहनांना पेट्रोल देण्याचे निर्देश
✨ औषधी दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
✨ ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर न पडू देण्याचे आवाहन

चंद्रपूर दि ४ एप्रिल :
चंद्रपूर जिल्ह्यात 4 एप्रिल पर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. विदेशात जाऊन आल्याची नोंद असणाऱ्या 198 लोकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण झाले आहे. आतापर्यंत आलेले सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आहेत त्यामुळे येणारे दोन आठवडे आणखी जबाबदारीने वागत आवश्यकता नसेल तर घरीच राहावे. विशेषता तरुणांनी यासाठी काटेकोर नियम पाळणे व सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज केले आहे.
        जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांचे मालक, होलसेल विक्रेते यांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
      जीवनावश्यक वस्तूशी संबंधित सर्व व्यापाऱ्यांनी यावेळी आवश्यक मनुष्यबळ व त्यांना प्रतिष्ठानाला पोहोचण्यासाठी पोलिस विभागाचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जीवनावश्यक वस्तू निर्मिती, विक्री व दुरुस्तीच्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व प्रतिष्ठान'च्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याबाबत सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.मात्र शक्य असेल तर या कर्मचाऱ्यांना पायी येण्याबाबत निर्देश द्यावेत. रस्त्यांवर दुचाकींची संख्या अधिक झाली असून यामुळे सामाजिक अंतर राखणे कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
     जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहे. मात्र अन्य राज्यातून येणारे अत्यावश्यक सामान, भाजीपाला, दूध, औषधी व अन्य वैद्यकीय सामानांचे वहन करणारे व यामध्ये सहभागी असणाऱ्या नागरिकांची आवश्यक ती तपासणी करण्याबाबतचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.
      कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ही बाब अतिशय धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याठिकाणी आणि तातडीने उपाययोजना करून सामाजिक अंतर राखले जाईल ,अशी व्यवस्था निर्माण करण्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये सध्या एकही रुग्ण नसतांना बाहेरून येणारा धोका पत्करायचा नाही. त्यासाठी सीमावर्ती भागातील नाकाबंदी आणखी भक्कम करणे व वैद्यकीय तपासणी वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
   सोबतच शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी ट्रॅक्टर सह दुचाकी पर्यंतच्या सर्व शोरूम सुरू करण्याचे निर्देश आज देण्यात आले. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेकॅनिक यांनी स्वतःजवळचे ओळख पत्र दाखवून आवश्यक सेवा नागरिकांना द्यावी. पोलिसांना तशा सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
      नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये, यासाठी अत्यावश्यक ज्या काही सेवा असतील त्या सुरू करण्यात आल्या आहेत. घरपोच किराणा, घरपोच खाद्यपदार्थ पोहोचविण्यासाठीची यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना देखील घरी किराणा पोहोचविण्यासाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. फारच गरज असल्यास घरातील सुदृढ व्यक्तीने आठवड्यातून एकदाच बाहेर पडून सर्व अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
      दरम्यान,महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या काळात जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे व्हाव्यात यासाठी अन्नधान्य, किराणा व औषधी या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. तसेच गरज पडल्यास काही दुकाने चोवीस तास चालु ठेवले जातील असेही स्पष्ट केले आहे.
    जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसून केवळ विदेशातून आलेले सहा नागरिक आता निगराणीखाली आहेत. 198 लोकांना तपासणीअंती धोक्याबाहेर घोषित करण्यात आले आहे. सध्या केवळ एक परदेशातून आलेला नागरिक इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईनमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment