चंद्रपुरातील दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर
कृष्ण नगरच्या रूग्णाचे 2 स्वॅब तपासणीला
पोलीसांच्या तपासणीला सुरूवात; 6 स्वॅब घेतले
जिल्ह्यात 442 नमुन्यांपैकी 2 पॉझिटीव्ह, 406 निगेटिव्ह; 34 प्रतीक्षेत
चंद्रपूर, दि. 18 मे: चंद्रपूर शहरात 2 मे रोजी कृष्ण नगर येथे आढळलेल्या रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल केले आहे. या रूग्णांचा 17 व 18 तारखेला 2 वेगवेगळे स्वॅब घेण्यात आलेले असून याचा अहवाल उद्यापर्यंत येणे अपेक्षित आहे. तर 13 मे रोजी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाला विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती करण्यात आले असून या दोन्ही पॉझिटीव्ह रूग्णांची प्रकृती स्थिर आहे.
आरोग्य विभागाकडून आज जारी केलेल्या मेडिकल बुलेटीन मध्ये दिलेल्या माहितीनुसार कृष्ण नगर येथील कंटेनमेंट झोनला 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे पूर्णत: सील करण्यात आलेला परिसर मोकळा करण्यात आलेला आहे. सर्व अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती व कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींचा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. तर, दिनांक 13 मे रोजी 23 वर्षीय युवतीच्या संपर्कातील अति जोखमीच्या सर्वच 7 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. या परिसरात 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 442 आहे. यापैकी 2 नागरिक पॉझिटिव्ह निघाले असून 406 नागरिक निगेटिव्ह आहे. तर 34 नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यात 989 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी तालुकास्तरावर 795 नागरिक तर, चंद्रपुर महानगरपालिकेमध्ये 194 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहे. तसेच 47 हजार 402 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले आहे. तर जिल्ह्यामध्ये 15 हजार 501 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेकपोस्टवर कार्यरत असणाऱ्या अति जोखमीच्या 134 पोलीसांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यापैकी 43 पोलीसांची तपासणी करण्यात आली असून 6 जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. पोलीसांना कोविड-19 चा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment