भिसी येथील व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लाखों रु. ची फसवणूक
- व्यापाऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांची पोलिसात जाण्याची तयारी
- पत्रपरिषदेत शेतकऱ्यांनी व्यक्त केली व्यथा
दिनचर्या न्युज :-
चिमूर,
भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशात 70 % नागरिक कृषी व्यवसायावर आधारित आहे. कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची बँक, व्यापारी, सावकार, शासन, प्रशासन यांच्याकडून फसवणूक झाल्याच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. असाच शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक करणारा व्यापारी तालुक्यातील भिसी येथील असून चिमूर व भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची कडधान्य खरेदी करणाऱ्या किशोर नेरलवार नामक व्यापाऱ्याने लाखो रुपये थकवून फसवणूक केली आहे.
तालुका भिवापूर येथील मंगेश संपत चाफले व टाका, ता. भिवापूर येथील बबन माणिकराव शहाणे यांनी किशोर नेरलवार या व्यापाऱ्याने त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती बाउंस झालेले चेक दाखवून दिली.
मंगेश संपत चाफले यांनी एकूण 9 लक्ष 85 हजार रु. चा चणा व सोयाबीन हा शेतमाल एप्रिल 2021 मध्ये किशोर नेरलवार यांना विकला. त्यावेळी दोन लक्ष रु. चाफले यांना नेरलवार यांनी दिले. मात्र उर्वरित 7 लक्ष 85 हजार रु. नेरलवार यांनी तीन महिने लोटले तरी दिले नाही. दरम्यान चाफले यांना नेरलवाल यांनी 3 लक्ष रु. चा चेक दिला. मात्र, नेरलवार यांच्या बँक खात्यात पैसेच नसल्याने चेक बाउंस झाला, अशी माहिती मंगेश चाफले यांनी दिली.
बबन शहाणे यांनी 3 लक्ष 45 हजार रु. चा सोयाबीन नेरलवार यांना विकला. त्यापैकी 2 लक्ष रु. शहाणे यांना मिळाले, 1 लक्ष 45 हजार रु. चा धनादेश नेरलवार यांनी दिला. पण शहाणे यांचाही धनादेश चाफले यांच्याप्रमाणेच बाउंस झाला.
भगवानपूर येथील एका शेतकऱ्याचे पैसे ऐन शेतीच्या हंगामातही न मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याचे मानसिक संतुलन बिघडले अशी माहिती पत्रपरिषदेत उपस्थित शेतकऱ्यांनी दिली.
मंगेश चाफले यांना हंगामाच्या वेळी नेरलवार यांच्याकडून पैसे न मिळाल्यामुळे पाच एकर शेती पडीत ठेवावी लागली, चाफले यांच्याकडे 2 लक्ष 50 हजार रु. पांजरेपार येथील साई कृपा कृषी केंद्राची उधारी आहे. त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची पाळी आली आहे, असे दुःख सदर शेतकऱ्याने पत्रकारांसमोर व्यक्त केले. तुम्ही शेतीची मशागत करण्यासाठी व्याजाने पैसे काढा, असा अफलातून सल्ला नेरलवार यांनी मंगेश चाफले यांना दिला.
हे दोघेच शेतकरी फसवणुकीचे बळी नाहीत. तर, चिमूर व भिवापूर तालुक्यातील भिसी, पुयारदंड, वासी, महालगाव, चिखलापार, सायगाव, नांद इत्यादी गावातील शेतकऱ्यांचे शेतमालाचे पैसे नेरलवार यांच्याकडे बाकी आहेत. शेती व अन्य कारणामुळे इतर शेतकऱ्यांना पत्रकार परिषदेत वेळेवर उपस्थित होणे शक्य झाले नाही,
अशी माहिती पीडित शेतकऱ्यांनी दिली.
जर चार दिवसाच्या आत आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही पीडित शेतकरी बाउंस चेक घेऊन पोलीस स्टेशन मध्ये तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे नेरलवार यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल करू; असा इशारा बबन शहाणे, मंगेश चाफले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला.
पीडित शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपबाबत भ्रमण ध्वनीवरून किशोर नेरलवार यांना विचारणा केली असता, शेतकऱ्यांचे पैसे माझ्याकडे बाकी आहेत, ही बाब कबूल केली. ते पैसे मी लवकरच देणार असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेत कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी नेते मोरेश्वर झाडे (वाढोणा) नारायण गेडाम (टाका) उपस्थित होते.
गावोगावचे शेतकरी माझ्याकडे त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन आले. म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी पत्रकार परिषदेत हजर झालो आहे.माझ्या गरीब शेतकरी बांधवांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याने चार दिवसाच्या आत पीडित शेतकऱ्यांचे पैसे द्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे.
-- कृषिभूषण मोरेश्वर झाडे.
--------------------------------------------------
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्यांची आर्थिक फसवणूक, लुबाडणूक मुळीच सहन केली जाणार नाही. जिल्हाधिकारी, कृषिमंत्री यांच्याकडे सदर प्रकरण आम्ही लावून धरू व कायदेशीर कारवाई करण्यास शासन प्रशासनाला बाध्य करू.
-- ऍड. नारायण जांभुळे ( मुख्य संयोजक - विदर्भावादी स्वाभिमानी संघटना )
( पत्रकार संघाला दूरध्वनी वरून दिलेली प्रतिक्रिया )
0 comments:
Post a Comment