जनकल्याण शहर उपजीविका केंद्राचा लोकार्पण सोहळा
भद्रावती (फोटो)
नगर परिषद भद्रावती दिअयो राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान जनकल्याण शहर उपजीविका केंद्राचा लोकार्पण सोहळा दिनांक 30 ला सुविधा केंद्र घुटकाळा येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार बाळू धानोरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रतिभा धानोरकर, विशेष अतिथी नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,प्रमुख अतिथी उपाध्यक्ष संतोष आमने, मुख्याधिकारी जगदीश गायकवाड, प्रफुल चटकी, सभापती चंद्रकांत
खारकर ,सुधीर सातपुते व अन्य सभापती तसेच नगरसेविका याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी जनकल्याण शहर उपजीविका केंद्र, जनकल्याण कपडा बँक , जनाकल्याण शूज चप्पल बँक, जनकल्याण पुस्तक व बुक बँक ,जनकल्याण बिछायत व केटरिंग केंद्र इत्यादींचा लोकार्पण सोहळा पार पडला.
भद्रावती नगर परिषदेच्या या केंद्राचे नाव केंद्र शासनाच्या माध्यमातून आले आहे .25 वर्षाच्या अथक परिश्रमामुळे भद्रावती चा कायापालट झाला. तालुक्यातही अशी केंद्र उभे झाले पाहिजे. मातोश्री पांदन विकास योजनेसाठी आम्ही प्रयत्न केले व महाराष्ट्र सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. केंद्र शासनाचे धोरण अत्यंत चुकीचे असून देशात सर्व गोष्टी विकल्या जात आहे अशी खंतही याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.
बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहे .नगर परिषद भद्रावती मध्ये महिलांना प्राधान्य दिले जाते. महिलांचे आजचे कार्य म्हणजे महिला सक्षमीकरणाचे एक पाऊल आहे.बचत गटाच्या विक्रीसाठी 2 ते 3 कोटी ची इमारत व्हावी त्या ठिकाणी शॉपिंग मॉल उभारला जावा यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.
महिला बचत गटाला या माध्यमातून हक्काचे स्थान मिळाले आहे .दिल्लीच्या टीमने येथे येऊन ,अभ्यास करून आपल्या केंद्राला मान्यता दिलेली आहे. शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून गरजूंना मोफत कपडे व इतर वस्तू तसेच बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू या ठिकाणी मिळणार आहे.
यासोबतच या ठिकाणी सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून एक केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या विविध कारागिरांची माहिती मिळू शकते. अशाप्रकारे काम करणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच केंद्र असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले
कार्यक्रमाचे संचालन ज्योती लालसरे, प्रास्ताविक रफिक शेख यांनी केले.
0 comments:
Post a Comment