येथील चांदा आयुध निर्माणी आता म्युनिशन इंडिया लिमिटेड या कंपनीत विलीन झाली असून या कंपनी अंतर्गत काम करणार असल्याची औपचारिक घोषणा विजया दशमीच्या शुभ पर्वावर नुकतीच करण्यात आली.
केंद्र सरकारने आयुध निर्माणी बोर्ड बरखास्त करुन देशातील ४१ आयुध निर्माणींचे ७ कार्पोरेट कंपन्यांमध्ये विभाजन केले. त्यात भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी ही म्युनिशन इंडिया लिमिटेड या कंपनीत विलीन झाली आहे.चांदा आयुध निर्माणी कंपनीला हस्तांतरित करण्याचा शानदार सोहळा चांदा आयुध निर्माणीच्या कान्फरंस सभागृहात पार पडला. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सात कंपन्या राष्ट्राला समर्पित होत असल्याचे जाहीर केले. भारताच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्याचे राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितले.डी.टी.एस.ओ.ला परिवाराप्रमाणे चालवा असे कंपन्यांच्या व्यवस्थापनांना आवाहन करत सर्व कर्मचारी खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मागील दोन दशकांपासून तज्ञ समितीकडून आयुध निर्माणीचा अभ्यास करूनच हा विभाजनाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असेही राजनाथ सिंग यावेळी म्हणाले.
यावेळी आयुध निर्माणीचे अस्थायी प्रभारी अधिकारी मनोज कुमार, अप्पर महाप्रबंधक संजीव भोला, राकेश ओझा, एस.आर.चन्ने, सुरक्षा अधिकारी लेफ्ट. कर्नल ए.एस.संधू, जे.सी.एफ.ए.राकेशकुमार, तहसीलदार डाॅ.नीलेश खटके, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक स्नेहा गणविर, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अमरकुमार, सहसंचालक एल.के.गलहोत, ओ.एफ.हायस्कुलचे प्राचार्य शिवानंद तिवारी, पी.एम.ओ.डाॅ.अभय नक्षणे, एस.एस.ओ.उल्हास ठाकरे, खलसे आणि आयुध निर्माणीचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी अस्थायी प्रभारी अधिकारी मनोजकुमार यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.तसेच आयुध निर्माणीत तयार होणा-या उत्पादनाची यावेळी प्रदर्शनीही भरविण्यात आली होती.तसेच चांदा आयुध निर्माणीने आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची टेलिफिल्मही उपस्थितांना दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंचालक एल.के.गलहोत यांनी केले. संचालन सुनीता फरदे आणि वंदना तांबे यांनी केले. तर आभार जे.डब्ल्यू.एम.गुरुविंदरसिंग यांनी मानले.
0 comments:
Post a Comment