चंद्रपूर:-चंद्रपूर येथील महाकाली मंदिर जवळील पार्वताबाई ओगले या महिलेचे यजमान मागच्या वर्षी कोवीडच्या कालखंडात प्रदीर्घ आजाराने मरण पावले . त्यांचे घर झरपट नदीच्या काठावर बांधले होते. यावर्षी चंद्रपूरात तीनदा महापुर आला आणि तिन्ही वेळा त्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले . जवळपास आठ फूट पुराचे पाणी त्यांच्या घरामध्ये होते . कसेबसे जीव वाचवून आणि हाती येईल ते सामान सोबत घेऊन त्यांना घर सोडावे लागले .
घरचे सर्व सोडलेले सामान पूर सोबत घेऊन गेला . उपजीविकेचे साधन म्हटलं तर बाई दारोदार भांडे विकून आपल्या कुटुंबाचं पोट भरणारी . एक मुलगी जयश्री जिला शिकण्याची खूप आवड आहे, तिला अधिकारी व्हायचे आहे ती UPSC ची तयारी पण करत आहे आणि दुसरा मोलमजुरी करणारा मुलगा आहे . त्यांच्यावर गुजरलेली नैसर्गिक आपत्ती ही त्यांना नवीन नाही .
गोंधळी समाजाच्या या कुटुंबावर जात पंचायतीने सात आठ वर्षापासून बहिष्कार टाकला होता आणि ही मानवनिर्मित आपत्ती पण त्यांनी हसत हसत सहन केली होती . त्यांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने समितीचे जिल्हाध्यक्ष मा सूर्यकांत खणके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक मदत तसेच हेल्पिंग हँड टीम वन तर्फे कुटुंबाच आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी शिलाई मशीन भेट देण्यात आली .यावेळी महाराष्ट्र अंनिस चंद्रपूरचे जिल्हा कार्याध्यक्ष पुंडलिक जाधव ,जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण , उपाध्यक्ष कैलास गर्गेलवार ,देवराव कोंडेकर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष भीमलालजी साव , हायटेक इन्स्टिट्यूट बाबुपेठचे संचालक राजू अडकीणे , शरणम सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शेखर तावाडे आणि हेल्पिंग हॅन्ड टीम वन चे वन चे दिलीप होरे , देवेंद्र गायकवाड , विलास कोहळे ,प्रदीप अडकिने आणि ओगले परिवारातील जयश्री आणि कुंदन ही मंडळी उपस्थित होती . यावेळी काही मंडळींनी व्यक्तिगत स्तरावर पण जयश्रीच्या शिक्षणासाठी काही आर्थिक मदत केली.

0 comments:
Post a Comment