चंद्रपूर : चंद्रपूर - वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. नवी दिल्लीत झालेल्या या भेटीदरम्यान त्यांनी चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेच्या संदर्भातील विविध समस्यांचे निवेदन दिले. यावेळी रेल्वे विषयक विविध समस्यांसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित मार्गी काढण्याचे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांना दिले.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. या भागात राजुरा, गडचांदूर क्षेत्र मागील अनेक दिवसांपासून समस्यांनी ग्रस्त आहे. तालुक्यातील अल्ट्राटेक आणि माणिकगड अंबुजा सिमेंट उद्योगांसाठी दिल्ली चेन्नई रेल्वे मार्गवर चुनाळा, राजुरा, अवरपुर पर्यंत रेल्वे लाईन निर्माण सत्तावीस वर्षांपूर्वी झाली होती. त्या मार्गावर केवळ कोळसा आणि सिमेंट वाहतूक करण्यात येते. या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही, याकडे देखील खासदार बाळू धानोरकर यांनी लक्ष वेधले.
या निवेदनात काझीपेठ - पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून तिन दिवस सुरु करणे, भाग्यनगरी एक्सप्रेस सिकंदराबाद ते बल्लारशाह - सिकंदराबाद सुरु करणे, बल्लारपूर- भुसावळ सेवाग्राम लिंक एक्स्प्रेस (५११९६) पूर्ववत सुरु करणे, नागपूर - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, बल्लारपूर जबलपूर व्हाया नागभीड इंटरसिटी एक्प्रेस, बल्लारपूर - मूल- नागभीड- ब्रम्हपुरी- गोंदिया रेल्वे मार्गावरील अंडरपास पावसाळ्यात शेतकऱ्यांना आवागमन करण्यास त्रासदायक ठरतात. त्याबाबत कायम स्वरूपी उपाययोजना करणे, राजुरा - असिफाबाद- हैद्राबाद मार्गावर रेल्वे गेट नं. LC No 3.0H व विरून स्टेशन महाराष्ट्र पोल नं. 159/17 जवळ अंडरपास तयार करणे, गडचांदूर चुनाळा वरून नागपूर शटल रेल्वे सुरु करणे, भांदक रेल्वे स्टेशन वर दक्षिण एक्सप्रेस ट्रेन नं. 12721 / 12722, मद्रास जम्मुतवी एक्सप्रेस ट्रेन नं. 16031/16032, मद्रास- लखनौ एक्सप्रेस ट्रेन नं. 18093/ 16094, मद्रास जोधपूर एक्सप्रेस ट्रेन नं. 22663 / 22664, दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेस ट्रेन नं. 12791/12792, पेरणाकुलम पटणा एक्सप्रेस ट्रेन नं. 16359, नवजिवन एक्सप्रेस ट्रेन नं 12656 / 12657, अँड ट्रक एक्सप्रेस ट्रेन नं. 12615/12616, हिसार एक्सप्रेस ट्रेन नं. 22737 या गाडयांना स्टॉपेज देणे.
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ क्षेत्रात येणारा चंद्रपूर- गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल आहे. नक्षल प्रभावित असल्याने विकासाची कामे पाहिजे, तशी होऊ शकत नाहीत. येथे राज्य परिवहन सेवेची बस सेवा चालते. मात्र, राज्य परिवहन मंडळ नेहमीच तोट्यात असतो. ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधा सुरू करण्यासाठी गो राऊंड ट्रेन मध्य रेल्वे व दक्षिण - पूर्व - मध्य रेल्वेने बल्लारपूर स्टेशन येथून सुरू करून चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, सेवाग्राम, नागपूर, भंडारा, गोंदिया, वडसा, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, चंद्रपूर - बल्लारशा अशी सुरू करण्याची मागणी खासदारांनी केली.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारा जबलपूर ते चंद्रपूर नवीन गाडी सुरू झाली आहे. ही गाडी चंद्रपूर ऐवजी बल्लारपूरपर्यंत (02274-02273) सुरू झाल्यास बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर येथील प्रवाशांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे महसुलात देखील मोठी वाढ होऊ शकते. अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक, माणिकगड आदी उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहेत. ही गाडी सौंदड, अर्जुनी, वडसा, नागभीड, मुल आणि मारोडा या स्थानकावर थांबल्यास अनेक प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकतो. याकडेदेखील मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
0 comments:
Post a Comment