चंद्रपुर : चंद्रपूरच्या स्वर्गीय मा.सा.कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुल म्हणजेच जिल्हा स्टेडियम मध्ये नवीन धावपट्टीचे लोकार्पणावरून मोठा वादंग निर्माण झाला होता.हा वाद शमण्याआधीच एका नवीन वादाला तोंड फुटलेले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात सामान्य नागरिकांना प्रवेशाकरिता प्रति महिना 500 रुपये तसेच खेळाडूंकरिता प्रति महिना 300 रुपये असे प्रवेश शुल्क व 200 रूपये नोंदणी शुल्क आकारल्याचे फलक दिनांक 27 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलात लावण्यात आले.
या प्रवेश शुल्काच्या विरोधात जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेतलेली असून जनविकास सेनेचे अध्यक्ष व मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना निवेदन देऊन प्रवेश शुल्क तातडीने मागे घेण्याची मागणी केलेली आहे.तसेच प्रवेश शुल्क मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा जनविकास सेने तर्फे देण्यात आलेला आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या खाजगीकरणाचा घाट रचण्यात आलेला असून देखभाल दुरुस्ती व सुरक्षेच्या नावाखाली एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कंत्राट देण्याचे कटकारस्थान रचण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा देशमुख यांनी केलेला आहे.जिल्हा क्रीडा संकुलाच्या खाजगीकरणाचा हा घाट हाणून पाडू असा इशारा सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे.
चंद्रपूर जिल्हा हा मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत पिछाडीवर असून जिल्ह्यातील अनेक तालुके आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत.आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्याच्या मागासलेल्या तालुक्यातील गोर-गरीब विद्यार्थी व खेळाडू जिल्हा क्रीडा संकुला मध्ये दररोज सरावासाठी येतात.तसेच तापमान वाढ व प्रदूषणामुळे त्रस्त चंद्रपूर शहरातील नागरिक सुद्धा आरोग्य जोपासण्याकरिता सकाळ-संध्याकाळ क्रीडा संकुलामध्ये फिरण्याकरिता येतात.
मात्र खेळाडू व सामान्य नागरिकांकरिता मोठे प्रवेश शुल्क आकारण्यात आल्यामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे.
या असंतोषाची दखल घेऊन तातडीने प्रवेश शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने आज दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना दिले. यावेळी जनविकास सेनेच्या महिला आघाडी प्रमुख मनीषा बोबडे ,युवा आघाडीचे अक्षय येरगुडे, प्रफुल बैरम व गितेश शेंडे तसेच अनेक युवा खेळाडू उपस्थित होते.
जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत तसेच मोठ्या प्रमाणात खनिज विकास निधी सुद्धा प्राप्त होतो. या निधीतून गरज असो किंवा नसो अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करून बगीचे-सौंदर्यीकरण इत्यादी कामे करण्यात येत आहेत. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यातून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचे हेतूने खनिज विकास निधी किंवा उद्योगाकडून प्राप्त होणाऱ्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्हा क्रीडा संकुलाची देखभाल करण्यात यावी व सर्वसामान्य गोरगरीब खेळाडूंना त्यांच्या क्षमतेनुसार संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुद्धा जनविकास सेनेने केलेली आहे.
0 comments:
Post a Comment