चंद्रपूर, दि. 16 : चंद्रपूर शहरातील अवैध सावकारी करणारे जुनोना चौक, बाबूपेठ येथील रहिवासी नामे गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर यांच्या घरावर सहकार व पोलिस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकली. या धाडीत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तीवर सावकारी अधिनियम 2014 च्या कलम 16 अन्वये कारवाई केली जात असल्याचे सहकार विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशान्वये, शासनाकडे बेकायदेशीर अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रारदारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, गजराजसिंग ठाकूर हे अवैध सावकारी करीत असल्याची माहिती मिळाल्याने चंद्रपूरचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक एस. एस. तुपट, बल्लारपूरचे एम.डी मेश्राम तसेच सहकार खात्यातील कर्मचारी यांच्या पथकासह अवैध सावकारी करीत असलेल्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली. आक्षेपार्ह कागदपत्रांचा शोध घेतला असता शोध मोहिमेत लिहिलेले व कोरे असे 98 स्टॅम्प पेपर, 112 कोरे धनादेश, रेव्हेन्यू तिकीट लावलेल्या 6 पावत्या, रकमेच्या नोंदी असलेले चार रजिस्टर, 10 बँक पासबुक, तसेच अनेक व्यक्तीच्या नावे असलेले मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, इतर विक्रीपत्र व मालमत्ता पत्र आदी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. सदर कागदपत्रांच्या चौकशीनंतर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे निबंधक एस. एस. तुपट यांनी सांगितले.
सदर कारवाई चंद्रपूरचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निबंधक एस. एस. तुपट यांच्या पथकाने केली. या पथकामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बल्लारपूरचे एम.डी मेश्राम, सहकार अधिकारी एस. के. बगडे, प्रशांत गाडे, श्री. जाधव, श्री. भोयर, श्री.सरपाते, श्री. गौरखेडे, श्रीमती सिडाम, श्रीमती दरणे आदींचा समावेश होता.
बेकायदेशीर सावकारीच्या अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, चंद्रपूर तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment