मुंबई : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू डोळ्यासमोर ठेवून या उत्सवाची सुरुवात केली त्या हेतूची जनजागृती करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. Celebrate this year's Ganeshotsav by implementing new concepts-Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar appeals
सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीत संबोधित करताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला आमदार आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, मुंबई महानगर पालिकेचे उपयुक्त रमाकांत बिरादार, मुंबई शहर अप्पर जिल्हाधिकारी रवी कट्टकधोंड, आदी उपस्थित होते.
ना. श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागाकडून यावर्षीही गणेशोत्सवात स्पर्धा घेण्यात येतील. यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी बैठक घेतली आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार चार फुटाच्या आतील गणेश मूर्ती मातीच्या व चार फुटावरील मुर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा मातीच्या बनविण्यात याव्यात. त्याबाबत न्यायालयाने दिलेले निर्देश पाळावेत. याबाबत मूर्तिकार बांधवांची पर्यावरण विभागासोबत बैठक घेण्यात येईल. महापालिकेने मुर्त्या बनविणे, मुर्त्यांचे विसर्जन, मूर्तीकरांना देण्यात येणारी जागा याबाबत एसओपी तयार करावी. ध्वनी क्षेपकाव्यतिरिक्त रात्री १० वाजेनंतर मंडपात करण्यात येणाऱ्या गणपती आरत्यांना परवानगी बाबत सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. या प्रकरणात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत पोलीस विभागाने दक्ष असावे. त्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा. महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी विविध परवानग्या देण्यासाठी ' एक खिडकी योजने'ची अंमलबजावणी करावी.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना एसटी महामंडळ तिकीट दारापेक्षा जास्तीचे दर लावत असल्याच्या तक्रारी आहेत, याबाबत तपासून संबंधितांशी चर्चा केली जाईल असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीला पोलीस, महापालिका, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी व मूर्तिकार बांधव उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment