तालुका प्रतिनिधी भद्रावती जावेद शेख:-एकीकडे रस्ते अपघात वाढत असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि शासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे. मात्र त्यानंतरही नागरिक काही ऐकण्याचे किंवा नियम पाळण्याचे नाव घेत नसल्याने आता भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांचे मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या हितार्थ मिशन 'अलर्ट' हाती घेतले आहे.आगामी सणासुदीला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून हे महाअभियान राबवून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कार्यवाहीची तोफ डागणार आहे.पोलिसांच्या या उपक्रमातून एकीकडे वाहतूक नियमांबाबत जनजागृती तर होणारच त्याचबरोबर दुसरीकडे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दंडाचा चोप देखील बसणार आहे.त्यामुळे वाहन चालवितांना नियमांचे पालन तसेच आपल्या वाहणासंबंधीचे कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.
अनेकदा वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे,दारू पिऊन वाहन चालविणे असे प्रकार सर्रासपणे करत असल्याचे दिसतात.पोलिसांकडून याबाबत नेहमीच जनजागृती करण्यात येत असते मात्र त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने पोलिसांनी अखेर वेगळ्या पद्धतीने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. पोळा,गणेश उत्सव आणि दुर्गा उत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.त्यात काही उर्मठ वाहनचालक सर्रास वाहतुकीचे नियम मोडतात. यातून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे आनंदाच्या या सणासुदीच्या काळात कोणत्याही कुटुंबावर दुःखाचे विरजण पडू नये म्हणून पोलिसांची ही भूमिका नागरिकांच्या हितार्थ असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.
वशिला खपवून घेणार नाही
अनेकदा वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर कार्यवाही केली तर वाहन चालक आपल्या राजकीय वशिलेबाजीने सुटका करण्याचा प्रयत्न करतात.
मात्र या अभियानात कोणताही वशिला खपवून घेणार नाही असे सुद्धा पोलिसांकडून संकेत देण्यात आले आहेत.
0 comments:
Post a Comment