चंद्रपूर : ‘जिल्ह्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कार्य सुरू आहे. अशा विविध योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचवून विकासाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करा,’ असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला केले.
Work towards fulfilling the resolution of the development of the poor-Guardian Minister Shri. Sudhir Mungantiwar
नियोजन भवन सभागृह येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप कांबळे, महाराष्ट्र भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, भाजपा महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी भाजपा महानगराचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, रवी आसवानी, सूरज पेदुलवार,संजय कंचर्लावार,विशाल निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
निराधार योजना सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘संजय गांधी निराधार योजनेची बैठक मी आग्रहाने घ्यायचो. निराधार, विधवा, परितक्त्या घटस्फोटीत व ज्यांना सहकार्याची गरज आहे अशा श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्परतेने कार्य केले आहे. 2 एप्रिल 2010 ला राज्याचा प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा ‘गरीबो के सन्मान में, भाजपा मैदान मे’ या घोषणेनुसार स्वतःला कामात झोकून दिले. गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान 600 रुपयांवरून 1200 रुपये करण्याचे सौभाग्य लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1200 रुपयांचे अनुदान 1500 रुपये केले.
ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले,’ राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटूंब प्रमुखांचा (स्त्री/पुरुष) अचानकपणे मृत्यू झाल्यास 2013 च्या अगोदर त्याचे अनुदान 10 हजार रुपये होते. हा प्रश्न केंद्र शासनाशी संबंधित होता. मात्र, केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार करून ही मदत 10 हजारांवरून 20 हजार रुपयांवर नेली. गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करीत आहेत. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणारे जगातील एकमात्र नेते देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत. कोविडच्या संकटात संपूर्ण देश संकटात होता. त्यावेळी देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र काम करत होते. जगातील श्रीमंत देशांना जे शक्य झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणले आणि कोरोना नियंत्रित करण्यासाठी निःशुल्क लस उपलब्ध करुन दिली.
गरिबांसाठी 10 हजार घरे
चंद्रपूर येथील म्हाडामध्ये गरिबांसाठी 10 हजार घरे बांधण्याची मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून गरिबांना अतिशय अल्प दरात घरे उपलब्ध होणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
नागरिकांच्या सेवेसाठी तीन निर्णय
गरिबांची सेवा करण्यासाठी तीन निर्णय घेण्यात आले आहेत. आर्थिक अडचण व पैशांअभावी गरिबांची नेत्रचिकित्सा होत नाही. याचा विचार करून चंद्रपूर आणि बल्लारपूर येथे फिल्म सिटीच्या माध्यमातून आय हॉस्पिटल ऑन व्हिल तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून वस्त्यांमध्ये नागरिकांच्या दारात पोहोचून निःशुल्क नेत्रचिकित्सा केली जाणार आहे. गेल्या वर्षी मुबंईच्या फोर्टीस हॉस्पिटलला लहान मुलांच्या हृदयावर निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच यावर्षी 25 लहान बालके ऑपरेशनसाठी मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलला पाठविण्यात आली आहेत. निश्चितपणे हे पुण्य कमविण्याचे भाग्य लाभले, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्प यात्रा
गरिबांसाठी असलेल्या योजना व त्या योजनांची माहिती गरिबांपर्यंत पोहोचावी यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकसीत भारत संकल्प यात्रा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात 12 कोटी शौचालये येत्या नऊ वर्षात बांधून पूर्ण झालीत. 2009 ते 2014 मध्ये सरकार नसताना राजीव गांधी घरकुल योजनेतून 1 लक्ष 50 हजार घरांना मंजुरी दिली होती आणि महाराष्ट्रात फक्त 4 हजार घरे पूर्ण झाली. आज देशामध्ये 4 कोटी घरे मंजूर केली आणि साधारणतः 3 कोटींपेक्षा जास्त घरे बांधून पूर्ण झाली याचा अभिमान आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
महिलांसाठी उज्वला योजना
देशात 2014 पर्यंत घरगुती सिलेंडरचा वापर करणारे देशात फक्त 14 कोटी कुटुंब होते. आता उज्वला योजनेच्या माध्यमातुन 32 कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग
दहा वर्षांत दिव्यांगाना 600 ते 700 तीन चाकी सायकल वितरीत करण्यात आले तर चार वर्षांमध्ये 1000 बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल देण्यात आल्या. दिव्यांगांसाठी मोठी योजना करण्यात येत असून या योजनेचा लाभ गोरगरीब दिव्यांग बंधू-भगिनींना होणार आहे. लवकरच ही योजना प्रस्तावित करण्यात येईल. या संदर्भात शासनाने स्वतंत्र दिव्यांग विभाग तयार केला आहे. या माध्यमातून दिव्यांगाच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, त्यांच्या समस्यांचे समाधान व्हावे यादृष्टीने कार्य केले जाईल, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
शासन आपल्या दारी
सर्व जिल्ह्यांमध्धील विविध प्रश्न वेगाने मार्गी लागावे म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गरिबापर्यंत शासन पोहोचेल, अशी ही योजना तयार करण्यात आली असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण
बिलकिस शेख जाकीर शेख, जिजाबाई जेंगठे, निर्मला राजू तपासे, परमानंद दत्ता, प्रियंका त्रिसुळे, रत्नमाला देशभ्रतार, राममुरत बिरबल यादव, सुजाता विश्वास, उर्मिला ठाकूर आदी संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावण बाळ योजना, विधवा निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
0 comments:
Post a Comment